विश्वचषक हॉकी स्पर्धा (महिला) : भारतीय महिलांकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

महिलांच्या एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी ड-गटातील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ६-१ असा धुव्वा उडवला.
विश्वचषक हॉकी स्पर्धा (महिला) : भारतीय महिलांकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा
(Photo-X)
Published on

ॲम्स्टेलवीन : महिलांच्या एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी ड-गटातील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ६-१ असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील पुढच्या फेरीत प्रवेश करण्याचे दावेदार स्थान अधिक मजबूत झाले आहे. भारताने २ सामन्यांतील ४ गुण व सरस गोलफरकाच्या बळावर गटात अग्रस्थान मिळवले आहे. आता गुरुवारी भारताची अखेरच्या साखळी लढतीत इंग्लंडशी गाठ पडेल.

बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे संयुक्तपणे पुरुष आणि महिलांची हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. त्यांपैकी महिला गटात भारताने सलामीच्या लढतीत चीनला बरोबरीत रोखले होते. आता दुसऱ्या लढतीत भारताने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. भारताकडून सहा वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल नोंदवले. सामन्याच्या तिसऱ्या उपांत्य फेरीत तीन गोल नोंदवत भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली. भारतासाठी सुनेलिता टोप्पो हिने ११व्या, नवनीत कौर हिने १७व्या, सुशीला चानू हिने २५व्या, दीपिकाने ३८व्या, लालरेम्सियामीने ४४व्या आणि साक्षी राणा हिने ४५व्या मिनिटाला गोल केले. आर्थिक अडचणींमुळे समाज माध्यमांवरील आवाहनानंतर शासकीय मदतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ एकच गोल करता आला. डीवॉल कायला हिने ५५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले.

या दणदणीत विजयामुळे ११ नवोदित खेळाडूंना संधी देणारे भारतीय मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. ड-गटातील तीन संघांमधील पात्रता शर्यतीत या विजयामुळे भारताला मोठी मदत झाली आहे. दोन सामन्यांतून चार गुण मिळवून भारतीय संघ उत्तम गोलफरकाच्या जोरावर सध्या गटात अव्वल स्थानी आहे. चीनचेही चार गुण असून इंग्लंड तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर दोन्ही सामने गमावलेला दक्षिण आफ्रिका शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारताचा पुढील सामना गुरुवारी इंग्लंडविरुद्ध होणार असून या लढतीवर पुढील फेरीतील प्रवेश अवलंबून असणार आहे.

भारताची आज पाकिस्तानशी गाठ

पुरुषांच्या हॉकी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी बुधवारी ड-गटातील हायव्होल्टेज सामन्यात आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध गेल्या दशकातील अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचे भारतीय संघाचे उद्दिष्ट असेल. दोन सामन्यांतून तीन गुण मिळवणाऱ्या भारतीय संघाला पुढील फेरीत पोहोचण्यासाठी केवळ बरोबरीची गरज आहे. दुसरीकडे, अवघा एक गुण खात्यावर असलेल्या पाकिस्तानला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. या गटातून दोन्ही सामने जिंकून इंग्लंडने आधीच पुढील फेरीत स्थान पक्के केले आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा ३-१ असा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला होता.

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, जिओहॉटस्टार ॲप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in