महिला आयपीएलची रणधुमाळी आजपासून; दुसऱ्या पर्वातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबईची दिल्लीशी गाठ

एकीकडे पुरुषांच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झालेले असतानाच दुसऱ्या बाजूला चाहत्यांना उत्सुकता आहे.
महिला आयपीएलची रणधुमाळी आजपासून; दुसऱ्या पर्वातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या 
मुंबईची दिल्लीशी गाठ

बंगळुरू : एकीकडे पुरुषांच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झालेले असतानाच दुसऱ्या बाजूला चाहत्यांना उत्सुकता आहे. ती वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) म्हणजेच महिलांच्या आयपीएलची. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारपासून महिला आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सची गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सशी गाठ पडणार आहे. १७ मार्चपर्यंत रंगणरी ही स्पर्धा यंदा बंगळुरू आणि नवी दिल्ली (अरुण जेटली स्टेडियम) येथे खेळवण्यात येईल.

गतवर्षी ४ मार्च रोजी महिलांच्या पहिल्यावहिल्या आयपीएलला मुंबईत सुरुवात झाली होती. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात हा ‘सुवर्णदिन’ ठरला होता. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या स्पर्धेद्वारे भारतीय संघाला असंख्य युवा क्रिकेटपटू गवसले. त्यामुळे दुसऱ्या हंगामातसुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवतींना छाप पाडण्याची संधी असून विदेशी खेळाडूंसह वावरण्याचा अनुभवही त्यांच्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

यापूर्वी चार वेळा महिलांची चॅलेंजर स्वरूपाची स्पर्धा खेळवण्यात आली होती. २०२३च्या सुरुवातीला भारताच्या युवतींनी १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. त्यामुळे महिला क्रिकेटला पुन्हा उभारी मिळाली. त्यानंतर मार्चपासून पाच संघांसह पूर्ण स्वरूपाची आयपीएल स्पर्धा सुरू झाली. यंदाही मुंबई, दिल्लीव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि यूपी वॉरियर्स हे पाच संघ या स्पर्धेत खेळतील. वर्षाखेरीस बांगलादेशमध्ये टी-२० विश्वचषक होणार असल्याने त्यादृष्टीने नव्या ताऱ्यांचा शोध घेण्यास यंदाची ‘डब्ल्यूपीएल’ फायदेशीर ठरेल.

सलामीच्या सामन्याचा विचार करता गतविजेता मुंबईचा संघ यंदा आणखी ताकदवान झाला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर, अष्टपैलू नॅट शीव्हर-ब्रंट, गतवेळची पर्पल कॅप विजेती हायली मॅथ्यूज, फिरकीपटू साइका इशाक असे प्रतिभावान खेळाडू मुंबईच्या ताफ्यात आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची निवृत्त विश्वविजेती कर्णधार मेग लॅनिंग यंदा दिल्लीला जेतेपद मिळवून देण्यास सज्ज आहे. त्यांच्याकडे शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, तिथास साधू, ॲनाबेल सदरलँड असे खेळाडू आहेत.

या स्पर्धेत हरमनप्रीत (मुंबई) व स्मृती मानधनाच्या (बंगळुरू) रूपात दोन भारतीय कर्णधार आहेत, तर गुजरात, यूपी व दिल्ली संघाचे नेतृत्व अनुक्रमे बेथ मूनी, एलिसा हीली, लॅनिंग या ऑस्ट्रेलियन खेळाडू करतील.

स्पर्धेविषयी महत्त्वाचे

२२ सामने यंदाच्या हंगामात होणार असून ४ मार्चपर्यंतचे ११ सामने बंगळुरूत होतील. त्यानंतर उर्वरित ११ सामने दिल्लीत खेळवण्यात येतील.

एका संघाला प्रत्येकी ८ सामने खेळायचे आहेत. साखळी फेरीअखेरीस अग्रस्थानावरील संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ची लढत होईल. चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील संघाचे आव्हान संपुष्टात येईल.

सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता खेळवण्यात येणार असले, तरी फक्त सलामीचा सामना उद्घाटन सोहळ्यामुळे अर्धा तास विलंबाने सुरू होईल.

मुंबई इंडियन्सचे सामने

दिनांक प्रतिस्पर्धी संघ

२३ फेब्रुवारी वि. दिल्ली कॅपिटल्स

२५ फेब्रुवारी वि. गुजरात जायंट्स

२८ फेब्रुवारी वि. यूपी वॉरियर्स

२ मार्च वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

५ मार्च वि. दिल्ली कॅपिटल्स

७ मार्च वि. यूपी वॉरियर्स

९ मार्च वि. गुजरात जायंट्स

१२ मार्च वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in