महिला आयपीएल स्पर्धा : मुंबईची अग्रस्थानासाठी दावेदारी

कर्णधार हरमनप्रीत कौरने (३३ चेंडूंत ५४ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला गोलंदाजांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभली.
महिला आयपीएल स्पर्धा : मुंबईची अग्रस्थानासाठी दावेदारी
एक्स @wplt20
Published on

मुंबई : कर्णधार हरमनप्रीत कौरने (३३ चेंडूंत ५४ धावा) साकारलेल्या अर्धशतकाला गोलंदाजांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) गुजरात जायंट्सला ९ धावांनी पराभूत केले. यासह मुंबईने अग्रस्थानासाठी दावेदारी केली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ६ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. हरमनप्रीतने ९ चौकारांसह ५४ धावा केल्या. तिला नॅट शीव्हर ब्रंट (३८), अमनजोत कौर (२७) व हीली मॅथ्यूज (२७) यांचीही उत्तम साथ लाभली.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ २० षटकांत १७० धावांत गारद झाला. ३० वर्षीय भारती फुलमालीने २५ चेंडूंत ६१ धावांची घणाघाती खेळी साकारून सामन्यात चुरस निर्माण केली होती. मात्र मॅथ्यूज व अमेलिया कर यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवून गुजरातला रोखले. ६ बाद ९२ अशा स्थितीतून गुजरातने १७० धावा केल्या. भारतीने ८ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनीही तिला सुमार क्षेत्ररक्षण करत साथ दिली. त्यामुळे गुजरातने अखेरच्या षटकापर्यंत मुंबईला कडवी झुंज दिली. मात्र पराभवामुळे ते तिसऱ्या स्थानीच राहणार हे पक्के झाले. त्यामुळे आता मुंबई व दिल्ली यांच्यात अग्रस्थानासाठी झुंज आहे.

बंगळुरू व यूपी संघ या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. दिल्लीचे ८ सामन्यांत १० गुण आहेत. २०२३मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या मुंबईला गतवर्षी एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यंदा त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा आहे.

स्मृतीला अखेर सूर गवसला

डावखुरी फलंदाज आणि कर्णधार स्मृती मानधनाने अखेर ५ सामन्यांचे अपयश पुसून काढत ३७ चेंडूंत ५३ धावा केल्या. तिला एलिस पेरी (नाबाद ४९), रिचा घोष (३६), जॉर्जिया वेरहॅम (नाबाद ३१) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईविरुद्ध २० षटकांत ३ बाद १९९ धावांचा डोंगर उभारला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा मुंबईने ८ षटकांत २ बाद ६५ धावांपर्यंत मजल मारली होती.

logo
marathi.freepressjournal.in