
बंगळुरू : महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलमध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे तुल्यबळ संघ एकमेकांविरुद्ध दोन हात करतील. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होईल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ तूर्तास ४ सामन्यांतील ३ विजयांसह गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. मेग लॅनिंगच्या दिल्लीचेसुद्धा ३ विजयांसह ६ गुण आहेत. मात्र त्यांची धावगती मुंबईपेक्षा सुमार आहे. तसेच दिल्लीने ५ लढती खेळल्या आहेत. साखळी फेरीच्या अखेरीस अग्रस्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो.
उभय संघांतील पहिल्या टप्प्यातील लढतीत दिल्लीने मुंबईवर अखेरच्या चेंडूवर सरशी साधली होती. त्यामुळे दोन्ही संघांमधील जुगलबंदी पाहण्याजोगी आहे. मुंबईच्या संघात स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारी नॅट शीव्हर ब्रंट, हायली मॅथ्यूज, सबनिम इस्माइल, अमनजोत कौर असे प्रतिभावान खेळाडू आहेत. दिल्लीची भिस्त शफाली वर्मा, मॅरीझेन काप, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर आहे.
मुंबईतील लढतींसाठी आजपासून तिकीटविक्री
डब्ल्यूपीएलच्या मुंबईत होणाऱ्या लढतींची तिकीटविक्री शुक्रवारपासून सुरू होईल. यंदा वडोदरा, बंगळुरू, लखनऊ व मुंबई या चार शहरांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. तूर्तास बंगळुरूमधील टप्पा सुरू आहे. त्यानंतर ३ ते ८ मार्च या कालावधीत लखनऊ येथील लढती होतील. मग १० ते १५ मार्चदरम्यान मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामने खेळवण्यात येतील. १० व ११ मार्च रोजी मुंबईची अनुक्रमे गुजरात व बंगळुरूशी गाठ पडेल. त्यानंतर १३ मार्चला एलिमिनेटर, तर शनिवार, १५ मार्चला अंतिम सामनासुद्धा मुंबईतच खेळवण्यात येईल. बूकमायशो या संकेतस्थळावर चाहत्यांना तिकीटे बुक करता येतील. १०० ते ५०० रुपयांपर्यंत तिकिटांचे दर आहेत.
वेळ : सायंकाळी ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी वाहिनी आणि जिओस्टार ॲप