
वडोदरा : गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा सर्वच आघाड्यांवर शानदार कामगिरी करण्याचे लक्ष्य महिला प्रीमियर लीगच्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सचे असेल. पहिल्या सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर हा संघ रविवारी यूपी वॉरियर्सविरुद्ध दोनहात करणार आहे.
हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २०२ धावा केल्या होत्या. मात्र त्याचा बचाव करण्यात संघाच्या गोलंदाजांना अपयश आले. ६ गोलंदाज असूनही गुजरातला प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात अपयश आले.
रिचा घोषला पहिल्याच चेंडूवर जीवदान दिले होते. त्यानंतर या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने गुजरातच्या गोलंदाजांना चोपून काढले. तिने २६ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकार लगावत ६४ धावा तडकावून सामना आपल्या बाजूने वळवला.
माजी कर्णधार बेथ मुनी (५६ धावा) आणि विद्यमान कर्णधार आश्लेघ गार्डनर (नाबाद ७९ धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर गुजरातने निर्धारित २० षटकांत ५ फलंदाज गमावून धावफलकावर २०१ धावा झळकवल्या होत्या.
दुसरीकडे यूपी वॉरियर्सचा संघ नवी कर्णधार दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. दुखापतीमुळे नियमित कर्णधार ॲलेस हेलीला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. दीप्तिने भारतीय संघातील महत्त्वाची खेळाडू आहे. परंतु गेल्या १० वर्षांच्या कारकीर्दीत तिला नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही.