
मुंबई : आपल्या शानदार नेतृत्वाने हरमनप्रीत कौरने कठीण परिस्थितीत मुंबई इंडियन्सला सावरले आहे. ही क्षमता मुंबईसाठी महत्त्वाची ठरत आहे. गुरुवारी येथे महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) एलिमिनेटरमध्ये मुंबई आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.
डब्ल्यूपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला दोन वेळा पराभूत केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत आधीच प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स हे संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानाचा फायदा मिळणार आहे.
सोमवारी शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा पराभव केला होता. त्या सामन्यात हरमनप्रीतने ३३ चेंडूंत ५४ धावा फटकावत संघाला नऊ धावांनी विजय मिळवून दिला होता.
मुंबई इंडियन्सच्या संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही. हेली मॅथ्यूजने आतापर्यंत संघाला दमदार सुरुवात करून दिली असून, तिच्या ऑफ स्पिन गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना त्रास दिला आहे. या मोसमात गुजरातविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूकडून पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. नेट स्किव्हर-ब्रंटने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. हरमनप्रीत कौरच्या फलंदाजीत यंदा सातत्य नव्हते. मात्र सोमवारी गुजरातविरुद्ध अर्धशतक झळकावल्याने तिच्यात आत्मविश्वास आला असेल.
गुजरात जायंट्सच्या कर्णधार ॲशले गार्डनरने यंदाच्या मोसमात बेथ मुनिच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मात्र मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरात पराभूत करणे सोपे नसणार.
मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नादिन डी क्लार्क, संस्कृती गुप्ता, सायका इशाक, शब्निम इस्माईल, जिंतीमणी कलिता, जी. कमलिनी, अमनदीप कौर, अमनजोत कौर, एस. कीर्तन, अमेलिया केर, अक्षिता महेश्वरी, हेली मॅथ्यूज, सजीवन सजना, नॅट स्किव्हर-ब्रंट, पारुनिका सिसोदिया, क्लोय ट्रायॉन.
गुजरात जायंट्स : अॅश्ले गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, डिएंद्रा डॉटिन, भारती फुलमाळी, काश्वी गौतम, डॅनिएल गिब्सन, दयालन हेमलता, तनुजा कंवर, मननत कश्यप, फोबी लिचफिल्ड, मेघना सिंग, बेथ मूनी, प्रकाशिका नाईक, प्रिया मिश्रा, सायली सातघरे, शबनम शकील, सिमरन शेख, लॉरा वॉलवारडर्ट.
वेळ : सायंकाळी ७.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क