Women's Pro Kabaddi League : आता महिलांचीही रंगणार प्रो कबड्डी लीग

पुरुषांच्या स्पर्धेच्या १० वर्षांच्या पार्श्वभूमीवर (Women's Pro Kabaddi League) मशाल स्पोर्ट्सचा निर्णय
Women's Pro Kabaddi League : आता महिलांचीही रंगणार प्रो कबड्डी लीग

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही महिन्यांपूर्वी पुरुषांच्या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर महिलांची आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला. शनिवार, ४ मार्चपासून मुंबईत महिलांच्या पहिल्यावहिल्या आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यातूनच प्रेरणा घेत आता मशाल स्पोर्ट्सने आता महिलांच्या प्रो कबड्डी लीगची (Women's Pro Kabaddi League) घोषणा केली आहे. यंदा पुरुषांची प्रो कबड्डी लीग १०व्या वर्षात पदार्पण करणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मशाल स्पोर्टसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की, “पुरुषांच्या प्रो कबड्डी लीगच्या यशामुळेच आम्ही महिलांसाठी व्यावसायिक कबड्डी लीग घेण्याचा निर्णय घेतला. आता कबड्डी हा भारतीय खेळ जागतिक स्तरावर नेण्यासाठी भारतीय कबड्डी महासंघ आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ यांच्याशी चर्चा करून महिला कबड्डी लीग आयोजित करण्यात येणार आहे.”

मशाल स्पोर्टसने भारतीय कबड्डी महासंघाच्या सहकार्याने २०१६मध्ये आयोजित केलेल्या महिलांच्या तीन संघांच्या कबड्डी चॅलेंज स्पर्धेतील यश व अनुभवामुळे आता महिलांची व्यावसायिक लीग आयोजित करण्याचे धाडस आम्ही केले आहे, असे सांगून गोस्वामी म्हणाले की, कबड्डी चॅलेंज स्पर्धेतील फायर बर्डस, आईस दिवाज, स्टॉर्म क्वीन्स या संघातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

९ वर्षांची प्रतीक्षा संपली!

कबड्डी चॅलेंज स्पर्धेतील विजेत्या स्टॉर्म क्वीन्स संघांची कर्णधार तेजस्विनी बाई म्हणाली की, प्रो कबड्डी लीगची २०१४मध्ये सुरुवात झाल्यापासून महिलांची ही अशीच लीग असावी, असे आम्हाला वाटत होते. अखेर या घोषणेमुळे ९ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. यामुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला कबड्डीपटूंचे स्वप्न साकार होत आहे. इंचोन येथे २०१४मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघाची कर्णधार असलेल्या तेजस्विनी बाई हिला अर्जुन पुस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in