

एजबॅस्टन : एकीकडे अमेरिकेत फिफा विश्वचषकाचा थरार सुरू झालेला असतानाच इंग्लंडमध्ये शुक्रवारपासून महिलांच्या महासंग्रामास प्रारंभ होईल. महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे १०वे पर्व यंदा १२ जून ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका लढतीने विश्वचषकाचे बिगुल वाजेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ रविवारी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
२००९पासून महिलांच्या टी-२० विश्वचषकाला प्रारंभ झाला. आतापर्यंतच्या नऊ पर्वांमध्ये तब्बल सहा वेळा ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंड, वेस्ट इंडिज व न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एकदा विश्वचषक उंचावला आहे. २०२४मध्ये न्यूझीलंडने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला नमवून प्रथमच जेतेपद काबिज केले. यंदा विश्वचषकात प्रथमच १२ संघ सहभागी झाले असल्याने त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
पहिल्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व नेदरलँड्स हे संघ आहेत. दुसऱ्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड व स्कॉटलंड या सहा संघांचा समावेश आहे. दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे पहिल्या गटात बलाढ्य संघांपैकी एखाद्याने निर्णायक लढत गमावली, तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. ५ जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक स्टेडियमवर अंतिम सामना रंगेल.
भारताचा विचार करता त्यांची टी-२० विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारताने फक्त २०२०मध्ये विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा पराभव झाला. २०२४च्या विश्वचषकात भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. आता गतवर्षी भारताने एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले. त्यामुळे देशातील महिला क्रिकेटला चालना मिळाली असून महिला संघाकडून या टी-२० विश्वचषकातही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे ते टी-२० विश्वचषकही पटकावू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
स्पर्धेत युवा खेळाडूंची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. इंग्लंडकडून अॅलिस कॅप्सी, टिल्ली कोर्टीन-कोलमन आणि फ्रेया केम्प तर श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्ने, इमेशा दुलानी, कविशा दिलहारी आणि काव्या कविंदी खेळणार आहेत. न्यूझीलंडची २५ वर्षीय कर्णधार अमेलिया कर ही सर्वात तरुण नेत्यांपैकी एक असून, भारतीय संघात श्री चरणी, यास्तिका भाटिया आणि नंदनी शर्मा या युवा खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने अनुभवी खेळाडूंवर भर दिला असला, तरी त्यांच्याकडे जॉर्जिया व्हॉल आणि लुसी हॅमिल्टन सारख्या प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा वोल्व्हार्ड करत असून, शबनम इस्माईल आणि डेन व्हॅन निकेर्क यांनी निवृत्तीतून पुनरागमन केले आहे. एकूणच आता महिलांच्या टी-२० विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्पर्धेचे स्वरूप कसे?
पहिल्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व नेदरलँड्स हे संघ आहेत. दुसऱ्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड व स्कॉटलंड या सहा संघांचा समावेश आहे. दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
प्रत्येक विजयासाठी २ गुण, तर लढत पावसामुळे अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे रद्द झाली तर १ गुण देण्यात येईल. पराभूत झाल्यास एकही गुण मिळणार नाही. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरचा अवलंब केला जाईल.
भारताचे सामने कधी व कोणाविरुद्ध?
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानाचा प्रारंभ करेल. त्यानंतर १७ जून रोजी भारतासमोर नेदरलँड्सचे आव्हान असेल. २१ जून रोजी भारताची प्रबळ दावेदार दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल. २५ जूनला मग भारत-बांगलादेश आमनेसामने येतील. २८ जून रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करेल. भारताचे सर्व साखळी सामने आपल्या वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. त्यामुळे चाहत्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार नाही.
हे चुकवू नका!
२००९ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन होत असून यंदा आयर्लंड आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश झाल्यामुळे प्रथमच एकूण १२ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
ऑस्ट्रेलियानंतर एकाच वेळी एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक जिंकणारा दुसरा संघ ठरण्याची भारताला संधी आहे. ऑस्ट्रेलियाने २०१३मध्ये एकदिवसीय, तर २०१४मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. तसेच २०२२ व २०२३मध्येही त्यांनी ही कामगिरी केली. भारताने २०२५मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. आता त्यांच्याकडे टी-२० विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
पहिला गट
भारत, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान
दुसरा गट
इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, स्कॉटलंड
सामने : ३३
दिवस : २४
संघ : १२
विजेता : १
महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक (साखळी फेरी)
वेळापत्रकात भारतीय संघाचे सामने लाल रंगाने दर्शवण्यात आले आहेत. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १, २ आणि १ हिंदी, २ हिंदी वाहिनीसह जिओहॉटस्टार ॲपवर करण्यात येईल.