ऐन नवरात्रीत, विश्वचषक अमिरातीत! आजपासून महिलांचा टी-२० वर्ल्ड कप, भारत-पाक लढत कधी? बघा टीम इंडियाचे वेळापत्रक

Women's T20 World Cup : एकीकडे भारतात गुरुवारपासून नवरात्रीचा उत्सव धडाक्यात सुरू होणार असून तिकडे संयुक्त अरब अमिरातीत महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळीही रंगणार आहे.
ऐन नवरात्रीत, विश्वचषक अमिरातीत! आजपासून महिलांचा टी-२० वर्ल्ड कप, भारत-पाक लढत कधी? बघा टीम इंडियाचे वेळापत्रक
सौजन्य - एक्स (@T20WorldCup)
Published on

दुबई : एकीकडे भारतात गुरुवारपासून नवरात्रीचा उत्सव धडाक्यात सुरू होणार असून तिकडे संयुक्त अरब अमिरातीत महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळीही रंगणार आहे. यूएई येथे ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ शुक्रवारी न्यूझीलंडशी सलामीला दोन हात करणार आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने २०२०च्या टी-२० विश्वचषकाची प्रथमच अंतिम फेरी गाठली होती, मात्र तेथे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२३च्या टी-२० विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पराभूत झाला. तसेच नुकताच भारताला आशिया चषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने नमवले. मात्र आता पुन्हा एकदा नव्या जोमाने हरमनप्रीतच्या रणरागिणी जगज्जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहेत. जुलै महिन्यात भारतीय संघ अखेरचा टी-२० सामना खेळला. त्यानंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भारताचे शिबीर झाले. अमोल मुझुमदार यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारताने दोन्ही सराव सामने जिंकून उत्तम लय मिळवली आहे.

टीम इंडियाचे सामने कधी?

भारताचा अ-गटात समावेश असून ते ४ तारखेला न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीने अभियानाची सुरुवात करतील. त्यानंतर अनुक्रमे पाकिस्तान (६ ऑक्टोबर), श्रीलंका (९ ऑक्टोबर) व ऑस्ट्रेलिया (१३ ऑक्टोबर) यांच्याशी भारताचे सामने होतील. भारत-पाकिस्तान लढत दुपारी ३.३० वाजता सुरू होईल, तर अन्य सामने भारतीय वेळेनुसार ७.३०ला सुरू होतील. १० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी ५ संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील.

ऑस्ट्रेलिया या स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या ८ पैकी ६ हंगामांचे जेतेपद मि‌ळवले आहे. तर इंग्लंड व वेस्ट इंडिजने एकदा विश्वचषक उंचावला आहे. बांगलादेशमध्ये यंदाचा विश्वचषक आयोजित करण्यात येणार होता. मात्र तेथील स्थिती बिघडल्याने ही स्पर्धा अमिरातीत होत आहे. त्या निमित्ताने दुबईतील स्टेडियममध्ये बुधवारी १० संघांच्या कर्णधारांचे फोटोशूटही पार पडले. यावेळी उंटांनी विशेष लक्ष वेधले.

गटवारी

अ-गट : भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका

ब-गट : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड

विश्वचषकासाठी भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, आशा शोबना, श्रेयांका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार. राखीव : उमा छेत्री, तनुजा कन्वर, सलिमा ठाकोर.

logo
marathi.freepressjournal.in