श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत महिला संघाचा विजय

गुरुवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३९ धावांनी मात केली.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत महिला संघाचा विजय

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (७८ धावा आणि १ बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. गुरुवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर ३९ धावांनी मात केली.

पल्लेकल्ले येथे झालेल्या या लढतीत भारताने दिलेल्या २५६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ४७.३ षटकांत २१६ धावांत संपुष्टात आला. कर्णधार चामरी अटापटू (४४) आणि निलाक्षी डीसिल्व्हा (नाबाद ४८) यांनी यजमानांकडून कडवा संघर्ष केला. परंतु डावखुरी फिरकीपटू राजेश्वर गायकवाडने तीन, तर मेघना सिंग आणि पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून श्रीलंकेला गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. हरमनप्रीत, दीप्ती शर्मा आणि हरलीन देओल या फिरकी त्रिकुटाने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. हरमनप्रीत सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. तिने तीन सामन्यांत ११९ धावा करण्यासह दोन बळीही मिळवले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीतने सात चौकार आणि दोन षटकारांच्या बळावर ८८ चेंडूंत ७५ धावांची खेळी साकारल्यामुळे भारताने ५० षटकांत ९ बाद २५५ धावा केल्या. पूजा (६५ चेंडूंत नाबाद ५६) आणि शफाली वर्मा (५० चेंडूंत ४९) यांनीही बहुमूल्य योगदान दिले. ६ बाद १२४ धावांवरून हरमनप्रीत आणि पूजा यांनी सातव्या गड्यासाठी रचलेली ९७ धावांची भागीदारी भारताच्या डावाला आकार देण्यात मोलाची ठरली. हरमनप्रीतने एकदिवसीय कारकीर्दीतील १६वे, तर पूजाने तिसरे अर्धशतक झळकावून भारताला अडीचशे धावांचा पल्ला गाठून दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in