नवी मुंबई: भारतीय महिला संघ ऐतिहासिक अशा एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. या सामन्यातील विजेता संघ प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाची माळ गळ्यात घालणार आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या १३व्या हंगामात प्रथमच नवा विजेता संघ मिळणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलेला भारतीय महिला संघ आणि प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.
स्पर्धेत भारतीय महिला संघ विजेता ठरला, तर महिला यश असेल. क्रिकेटमध्ये भारतासाठी अभूतपूर्व
जेमिमा रॉड्रिग्जच्या अविस्मरणीय नाबाद १२७ धावा आणि हरमनप्रीतच्या ८९ धावांच्या खेळीमुळे भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सात वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाची धूळ चारली.
२०१७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २०२३ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव झाला., तसेच २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताचा पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला.
यापूर्वी झालेल्या एक दिवसीय विश्वचषकाच्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने दोनदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता भारतापुढे प्रथमच विश्वचषक विजयाचे आव्हान आहे.
तीन सलग पराभवानंतरही भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला मात देत स्पर्धेत पुनरागमन केले. उपांत्य फेरीत भारतीय महिला संघ दबावाखाली होता. मात्र हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जने मोठी भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया रचला.
या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु तिने निराश केले.
डी. वाय. पाटील स्टेडियमची फलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी पाहता पुन्हा धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा कस लागणार आहे.
उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला असला तरी तो अत्यंत रोमहर्षक होता. या सामन्यात क्रांती गौड आणि रेणुका सिंग ठाकूरला लय मिळाली नाही. या सामन्यात भारताने खराब क्षेत्ररक्षण केले. कर्णधार हरमनप्रीतने एक सोपा झेल सोडला.
दीप्ती शर्माने स्पर्धेत आतापर्यंत १७ विकेट मिळवल्या आहेत. त्यामुळे तिच्याकडून अंतिम सामन्यात चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकने आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ६९ धावांवर गडगडला. त्यानंतर इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९७ धावांवर त्यांचा संपूर्ण संघ माघारी परतला. मात्र त्यानंतरही या संघाने शानदार पुनरागमन केले.
अनुभवी मरिझान कॅप (२०४ धावा, १२ बळी), नाडिन डी क्लर्क (१९० धावा, ८ बळी), ताझमिन ब्रिट्स (२१२ धावा), क्लोए ट्रायॉन (१६७ धावा, ५ बळी) आणि कर्णधार लॉरा वुल्वाई (४७० धावा) यांनी संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावल्या आहेत.
स्पर्धा जसजशी पुढे गेली तशी लॉरा जबाबदारीने फलंदाजी करत आहे. तिची ब्रिट्ससोबतची सलामी भागीदारी भारतासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
डावखुरी फिरकी गोलंदाज नॉन्कुलुलेको म्लाबा (१२ बळी) भारताच्या उजव्या हाताच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकते.
भारतीय महिला संघाने आजतागायत एकदाही एकदिवसीय विश्वचषक उंचावलेला नाही. त्यामुळे विजेतेपद उंचावण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आशा आहे की उद्याचा दिवस भारतासाठी खास ठरेल. आम्ही खूप परिश्रम घेतले आहेत. विश्वचषकाची अंतिम फेरीसाठी भारतीय महिला संघ खूप उत्साही आहे. खेळाडू एकमेकांना पाठिंबा देत आहेत. संघात एकजूट आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनंतर जगाला नवा महिला एकदिवसीय विश्वचषक विजेता मिळणार आहे.
हरमनप्रीत कौर, कर्णधार, भारताची महिला संघ
भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात आजपर्यंत ३४ एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यातील २० सामन्यांत भारताने बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व असल्याचे आकडेवारीवरून दिसते.