इंदौर : सलग दोन सामन्यांत पराभूत झाल्यानंतर दबावाखाली असलेल्या भारतीय महिला संघासमोर रविवारी तगड्या इंग्लंडचे आव्हान आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा गोलंदाजीतील समन्वय बिघडला आहे. सहाव्या गोलंदाजाला संधी देऊन गोलंदाजीत समतोल राखण्याचा प्रयत्न भारतील महिला संघ करू शकतो. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतासाठी या सामन्यात विजय गरजेचा आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर भारताच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विश्वचषकात पाच फलंदाज, यष्टीरक्षक आणि पाच गोलंदाज (तीन अष्टपैलू) अशा खेळाडूंचा भारतीय महिला संघात समावेश आहे. मात्र या संघात भारतीय संघाच्या मर्यादा उघड होत आहेत. स्पर्धेत उर्वरित तीन सामने शिल्लक असताना भारतासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. उपांत्य फेरीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला उर्वरित ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकणे गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ गोलंदाज खेळवण्याचे धोरण अयशस्वी ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याच पद्धतीने संघ निवड करण्यात आला होता. परंतु पुन्हा भारताला पराभव स्विकारावा लागला. प्रतिस्पर्धी संघांनी २५१ आणि ३३० धावांचे लक्ष्य सहज गाठले गेले. या सामन्यांत भारताचा गोलंदाजी विभाग कमी पडला. या दोन्ही सामन्यांत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात गोलंदाजी विभाग अयशस्वी ठरली.
अष्टपैलूंवरील भरवशाचा फटका
प्रमुख गोलंदाजांची अनुपस्थिती भारताला या दोन्ही लढतीत महागात पडली. अष्टपैलूंच्या भरवशावर खेळताना भारताने रेणुका सिंह ठाकूरला बाकावर बसवले आणि तिच्या जागी अमनजोत कौरला संघात स्थान दिले. त्याचा फटका भारताला या दोन सामन्यांत बसला. प्रमुख गोलंदाजांची उणीव भारताला जाणवली. ५० षटके फेकण्यासाठी भारताच्या ताफ्यात त्या तोडीचे गोलंदाज नव्हते. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंकडून गोलंदाजी करून घेण्याची वेळ भारतावर आली. त्याचा फायदा आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने घेतला. हे दोन्ही सामने भारताने गमावले.