मुंबई : मी ऑलिम्पिक पदक जिंकले म्हणजे खूप काही वेगळे केले असे मानत नाही. मी पूर्वीही स्वप्निल कुसळेच होतो आणि यापुढेही स्वप्निल कुसळेच राहणार, अशी भावना भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेने व्यक्त केली.
“मला रायफल थ्री-पोझिशन प्रकारात सुवर्णपदक मिळवायचे आहे. त्यामुळे त्याच उद्देशाने सरावाला सुरुवात करणार आहे. चाहत्यांच्या नजरेतून मी आता प्रसिद्ध व्यक्ती झालो असलो, तरी मी तसे मानत नाही. माझी देहबोली पूर्वी होती तशीच आहे आणि माझी जीवनपद्धती देखील बदललेली नाही. मी तोच स्वप्निल आहे, जो ऑलिम्पिकपूर्वी होता,” असे स्वप्निल मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान म्हणाला. “कारकीर्दीत ऑलिम्पिक सुवर्णपदक हेच माझे ध्येय राहणार असून त्याचे दडपणही माझ्यावर नाही. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करायचे आहे, ते प्रयत्न मी करणार,” असेही स्वप्निलने सांगितले.
“एक भारतीय आणि साहजिकच महाराष्ट्रातून आल्याने ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा मला अभिमान वाटतो. पदक जिंकले तेव्हा मी महाराष्ट्राचा कितवा पदकविजेता अशी कुठलीही भावना माझ्या मनात नव्हती. मी केवळ माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आणि देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला,” असेही स्वप्निलने नमूद केले. “माझ्या यशात माझे कुटुंबीय, तुम्ही चाहते आणि प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे मान्य केले. हे सर्व नसते, तर मी पदकापर्यंत पोहोचूच शकलो नसतो.” असे स्वप्निल म्हणाला.
रेंजवर सराव करण्याची संधी लाभदायी
ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धा पार पडणाऱ्या शूटिंग रेंजवर सराव करण्याची संधी मिळाल्यामुळे मला लढतीच्या दिवशी रेंजवर जुळवून घेण्यास कठीण गेले नसल्याचेही स्वप्निल म्हणाला. स्वप्निलने या वेळी पुन्हा एकदा प्रशिक्षक दीपाली देशपांडे माझी दुसरी आईच असल्याचे सांगितले. त्यांनी माझ्याकडून खूप सराव करून घेतला. मी जेवढे त्यांचे ऐकत होतो, त्यापेक्षा त्या मला अधिक समजून घेत होत्या, अशा शब्दांत त्याने देशपांडेंबद्दल आदर व्यक्त केला.