जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा आजपासून नवी दिल्लीत थरार; पहिल्या दिवशी भारताच्या पाच खेळाडूंचे सामने, सिंधू, लक्ष्यवर प्रामुख्याने चाहत्यांच्या नजरा

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू १७ वर्षांनंतर भारतात रंगणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सहाव्या पदकासाठी मैदानात उतरणार आहे.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा आजपासून नवी दिल्लीत थरार; पहिल्या दिवशी भारताच्या पाच खेळाडूंचे सामने, सिंधू, लक्ष्यवर प्रामुख्याने चाहत्यांच्या नजरा
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा आजपासून नवी दिल्लीत थरार; पहिल्या दिवशी भारताच्या पाच खेळाडूंचे सामने, सिंधू, लक्ष्यवर प्रामुख्याने चाहत्यांच्या नजरा(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू १७ वर्षांनंतर भारतात रंगणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सहाव्या पदकासाठी मैदानात उतरणार आहे. सोमवारी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी बंदिस्त स्टेडियमवर सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू घरच्या मैदानाचा फायदा उठवण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्टार स्पोर्ट्सवर सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

सिंधूने यापूर्वी जागतिक स्पर्धेत २०१९ मधील सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकली आहेत. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ चीनच्या लिन डॅन आणि झाओ युनलेई यांनीच पाच पदके जिंकली आहेत. त्यामुळे यंदा उपांत्य फेरीत प्रवेश करून किमान कांस्यपदक निश्चित करताच सिंधू सहा पदके जिंकणारी जगातील पहिली खेळाडू ठरेल. नववी मानांकित सिंधू पहिल्या फेरीत आयर्लंडच्या १४१व्या क्रमांकावरील सोफिया नोबेलविरुद्ध खेळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर चीनच्या वांग झी यीचे, तर उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीचे आव्हान असू शकते. गेल्या महिन्यात जपान ओपन सुपर ७५० चे विजेतेपद मिळवणारी सिंधू आत्मविश्वासाने भरलेली आहे.

पुरुषांच्या दुहेरीत पाचवे मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी पुन्हा एकदा पदकावर निशाणा साधणार आहे. २०२२ आणि २०२५ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या या जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. तथापि, सात्विकच्या खांद्याची दुखापत ही भारतीय गोटासाठी चिंतेची बाब आहे. दुखापतीमुळे तो महिनाभर कोर्टपासून दूर होता. अर्जुन आणि हरिहरन अमसाकरुणन ही दुसरी भारतीय दुहेरी जोडी आयर्लंडच्या स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्सविरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल. पुरुष एकेरीत २१ वर्षीय आयुष शेट्टीला पहिल्याच फेरीत विद्यमान विजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या शि यु चीविरुद्ध खडतर सामना खेळावा लागणार आहे. १४वा मानांकित लक्ष्य सेन ऑस्ट्रियाच्या कोलिन्स व्हॅलेंटाईन फिलिमोनविरुद्ध खेळणार आहे. महिला एकेरीत युवा उन्नती हुड्डा म्यानमारच्या थुझारविरुद्ध पदार्पण करेल. महिला दुहेरीत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिषा क्रास्टो भारताचे प्रतिनिधित्व करतील.

आयोजक म्हणूनही प्रतिष्ठा पणाला

भारतासाठी ही स्पर्धा मैदानाबाहेरही अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेसाठी पक्षी आणि माकडांचा त्रास रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्टेडियममधील हवेशीर मार्ग सील करण्यात आले असून लाकडी दरवाजांच्या जागी दुहेरी स्वयंचलित प्रवेशप्रणाली बसवण्यात आली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंडिया ओपन दरम्यान हवेची गुणवत्ता आणि स्टेडियममधील समस्यांमुळे टीका झाली होती. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरण अधिक खबरदारी बाळगत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in