
लिव्हरपूल : जास्मिन लंबोरिया आणि मीनाक्षी हुडा यांनी रविवारी सुवर्ण पंच लगावला. लिव्हरपूल, इंग्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत या दोघींनी आपापल्या वजनी गटात ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याशिवाय नुपूर शेरॉनने रौप्य, तर पूजा राणीने कांस्यपदक जिंकले. त्यामुळे एकूण ४ पदकांसह भारताने या स्पर्धेची सांगता केली.
लिव्हरपूल, इंग्लंड येथे गेल्या आठवड्यापासून जागतिक बॉक्सिंग स्पर्धा सुरू असून यामध्ये भारताचे महिला व पुरुष बॉक्सर मिळून २० खेळाडू सहभागी झाले होते. यंदा नव्या प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगची जागतिक स्पर्धा झाली. यापूर्वी आयबीए म्हणजेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धांचे आयोजन केले जायचे. या स्पर्धेत ६५ देशांतील ५५० बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. यामध्ये १७ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेते आहेत. त्यामुळे भारताला कडवे आव्हान मिळाले.
दरम्यान, रविवारी महिलांच्या ५७ किलो वजनी गटात जास्मिनने पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पोलंडच्या जुलिया झेरेमेटाला ४-१ अशी धूळ चारली. हरयाणाच्या २४ वर्षीय जास्मिनचे हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले. तिने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही समावेश नोंदवला होता. जास्मिनने वर्षाच्या सुरुवातीला बॉक्सिंग विश्वचषकात सुवर्ण पटकावले. तसेच २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जास्मिनने कांस्यपदक जिंकले होते.
“माझ्या भावना मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. गेल्या दोन जागतिक स्पर्धांमध्ये मला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. विश्वचषकातील पदकामुळे माझा आत्मविश्वास उंचावला. हे सुवर्णपदक मला आयुष्यभरासाठी स्मरणात राहील,” असे जास्मिन म्हणाली.
त्याशिवाय महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीनाक्षीने सुवर्ण कामगिरी करताना पॅरिस ऑलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या कझाकस्तानच्या नेझीम कायझाबायला ४-१ असे नेस्तनाबूत केले. मीनाक्षीचेसुद्धा हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले. एकंदर भारतासाठी जागतिक सुवर्ण जिंकणाऱ्या महिलांच्या यादीत मीनाक्षी व जास्मिन यांनी स्थान मिळवले. एकंदर १० जणींनी भारतासाठी जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पटकावले आहे.
महिलांच्या ८०+ किलो वजनी गटातील अंतिम फेरीत भारताच्या नुपूरला मात्र पराभव पत्करावा लागला. पोलंडच्या अगाता कमरस्काने नुपूरवर ३-२ अशी मात केली. तसेच महिलांच्या ८० किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत इंग्लंडच्या एमिलीने भारताच्या पूजाला ४-१ असे नामोहरम केले. त्यामुळे पूजाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बॉक्सिंगमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली, तरी पदक पक्के होते. कांस्यपदकासाठी वेगळी लढत खेळवली जात नाही.
पुरुषांमध्ये भारतीय बॉक्सर्सनी मात्र निराशा केली. एकही पुरुष यावेळी उपांत्य फेरी गाठू शकला नाही. २०२३च्या जागतिक स्पर्धेत पुरुषांनी तीन कांस्यपदके जिंकली होती. तसेच निखत झरीन व लव्हलिना बोर्गोहैन यांनादेखील यावेळी अपयश आले. २०२२ व २०२३च्या जागतिक स्पर्धेत निखतने सुवर्ण पटकावले होते. तर लव्हलिना ही ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती होती.
भारतासाठी १० जणींनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. यामध्ये मेरी कोम (६ वेळा), निखत झरीन (२ वेळा), सरिता देवी, जेनी एल, लेखा केसी, नितू घांगस, लव्हलिना बोर्गोहैन, स्वीटी बोरा, जास्मिन लंबोरिया व मीनाक्षी हुडा यांचा समावेश आहे.
भारताने या स्पर्धेत २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशी एकूण चार पदके जिंकली. त्यामुळे भारताने पदक तालिकेत तिसरे स्थान मिळवले. उझबेकिस्तानने ७ पदकांसह पहिले, तर कझाकस्तानने ५ पदकांसह दुसरे स्थान प्राप्त केले.