बुद्धिबळपटू प्रज्ञानानंदकडून विश्वविजेता ठरलेल्या कार्लसनचा पुन्हा पराभव

प्रज्ञानानंदने नॉर्वेच्या कार्लसनवर मिळविलेल्या तीन विजयात टायब्रेकच्या दोन सामन्यांचा समावेश आहे
बुद्धिबळपटू प्रज्ञानानंदकडून विश्वविजेता ठरलेल्या कार्लसनचा पुन्हा पराभव

एफटीएक्स क्रिप्टो कप स्पर्धेत १७ वर्षीय बुद्धिबळपटू रामबाबू प्रज्ञानानंदने पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा पुन्हा पराभव केला. चेन्नईच्या प्रज्ञानानंदने ४-२ ने विजय मिळविला. भारतीय ग्रँडमास्टरने यावर्षी तिसऱ्यांदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लसनला पराभूत केले; मात्र कार्लसनने सर्वाधिक गुण मिळवत विजेतेपद पटकाविले.

प्रज्ञानानंदने नॉर्वेच्या कार्लसनवर मिळविलेल्या तीन विजयात टायब्रेकच्या दोन सामन्यांचा समावेश आहे; मात्र कार्लसनवर विजय मिळवूनही त्याने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकाविले.

कार्लसनने सर्वाधिक एकूण १६ गुण मिळवले; तर प्रज्ञानानंदने १५ गुण मिळविले. प्रज्ञानानंद यावेळी उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला. चेन्नई येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील कांस्यपदक विजेता संघात तो होता.

कार्लसन-प्रज्ञानानंद यांच्यातील पहिले दोन सामने अनिर्णीत राहिले होते. कार्लसनने तिसरा सामना जिंकला; पण भारतीय खेळाडूने हार न मानता चौथा गेम जिंकून सामना टायब्रेकरपर्यंत खेचला. त्यानंतर टायब्रेकरमध्ये दोन्ही गेम जिंकून भारतीय खेळाडूने कार्लसनला चकित केले. प्रज्ञानानंदने फिरोजावर विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अनिश गिरी आणि लेव्हॉन अरोनियन यांचाही पराभव केला. अन्य अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये फिरोजाने अरोनियनचा २-५,१-५ असा, क्वांग लिम लेने (चीन) हॅन्स निमानचा आणि पोलंडच्या जॅन क्रिझिस्टोफने अनिश गिरीचा २-५,०-५ असा पराभव केला.

पराभव हा वाईटच असताे, मी खराब खेळलो - कार्लसन

“मी खराब खेळल्यामुळे माझा पराभव झाला. पराभव होणे कधीही चांगले नसते,” असे सामन्यानंतर कार्लसनने सांगितले.

आणखी चांगली कामगिरी करायला हवी होती - प्रज्ञानानंद

विजयानंतर प्रज्ञानानंद म्हणाला की, “मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. तरीही दुसरे स्थान देखील ठीक आहे.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in