

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) : बुद्धिबळविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या जागतिक अजिंक्यपद लढतीला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. भारताचा विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश आणि उझबेकिस्तानचा युवा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव्ह यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. विश्वविजेतेपदासाठी आमनेसामने येणारे हे दोन्ही खेळाडू वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बुद्धिबळातील सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत.
मात्र, या लढतीपूर्वी दोघांची तयारी आणि अलीकडील कामगिरी यामध्ये मोठी तफावत दिसून येते. २०२४ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी सर्वांत तरुण निर्विवाद विश्वविजेता बनलेल्या गुकेशला गेल्या काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे, सिंदारोव्हने दमदार कामगिरीच्या जोरावर जागतिक बुद्धिबळात आपले स्थान भक्कम केले आहे.
गुकेशचा संघर्ष
विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर गुकेशला अद्याप एकाही स्पर्धेत एकट्याच्या बळावर विजेतेपद मिळवता आलेले नाही. २०२६ मध्ये प्राग इंटरनॅशनल चेस फेस्टिव्हल, नॉर्वे चेस आणि चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धांमध्ये त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे विश्वविजेतेपदाच्या बचावासाठी तयारी करताना त्याने स्पर्धांचे वेळापत्रक बदलले. ग्रँड चेस टूरच्या क्लासिकल स्पर्धांपासून दूर राहत त्याने वॉर्सा आणि झाग्रेब येथील रॅपिड व ब्लिट्झ स्पर्धांमध्येच सहभाग घेतला. लास वेगासमधील फ्रीस्टाइल चेस स्पर्धेतही त्याने भाग घेतला नाही. प्रवासाचा थकवा टाळून प्रशिक्षकांसोबत तयारीला अधिक वेळ देण्याचा त्याचा प्रयत्न होता. गुकेशचे क्लासिकल रेटिंग घसरून २७१० झाले असून, तो जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानावर आहे. एलो रेटिंगच्या युगातील विद्यमान विश्वविजेत्यांमध्ये त्याचे हे सर्वांत खालचे स्थान ठरले आहे.
सिंदारोव्हची आगेकूच
सिंदारोव्हसाठी मात्र २०२६ हे वर्ष कारकिर्दीला नवी उंची देणारे ठरले. त्याने पदार्पणातच फिडे कँडिडेट्स स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वांत युवा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत तो अपराजित राहिला. समरकंद येथे झालेल्या ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये उझबेकिस्तानच्या सुवर्णपदक विजेत्या संघातही त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याने वैयक्तिक कांस्यपदकही मिळवले. क्लासिकल बुद्धिबळात तो जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानापर्यंत पोहोचला आहे. सेंट लुईसमधील क्लच चेस स्पर्धा जिंकल्यानंतर लाइव्ह रॅपिड क्रमवारीतही दुसरे स्थान मिळवले.
स्पर्धेचे स्वरूप आणि बरंच काही...
या लढतीत एकूण १४ क्लासिकल डाव खेळवले जातील. सर्वप्रथम ७.५ गुण मिळवणारा खेळाडू विश्वविजेता ठरेल. निर्धारित डावांनंतर गुण समान राहिल्यास टायब्रेकरद्वारे विजेता निश्चित केला जाईल.
खेळाडूंना पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, त्यानंतर उर्वरित डावासाठी ३० मिनिटे मिळतील. ४१व्या चालीपासून प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदांची अतिरिक्त वेळ दिली जाईल. बुद्धिबळ अधिक आक्रमक आणि रंगतदार व्हावे यासाठी ४० चाली पूर्ण होण्यापूर्वी परस्पर संमतीने बरोबरी स्वीकारता येणार नाही. पहिल्या डावात गुकेश काळ्या मोहऱ्यांनी खेळणार आहे. रंगवाटप सोहळ्यात त्याने काळ्या रंगाचा घोडा निवडला.
या विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी एकूण २५ लाख डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. प्रत्येक निर्णायक विजयासाठी २ लाख डॉलर दिले जातील, तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये विभागली जाईल. टायब्रेकर झाल्यास विजेत्याला १३ लाख, उपविजेत्याला १२ लाख डॉलर मिळतील.
दोन्ही खेळाडूंच्या मदतीसाठी अनुभवी मार्गदर्शकांची फळी सज्ज आहे. गुकेशला पोलंडचे ग्रेगोर्झ गाजेव्हस्की मार्गदर्शन करतील, तर सिंदारोव्हच्या संघात आंतरराष्ट्रीय मास्टर रोमन विदोन्याक असण्याची शक्यता आहे. जिनिव्हातील कोलॉनी येथील फॉन्डेशन मार्टिन बोडमर येथे ही लढत होणार आहे. १.५ लाखांहून अधिक दस्तऐवजांचा संग्रह असलेल्या या ग्रंथालय आणि संग्रहालयात बुद्धिबळाच्या नव्या विश्वविजेत्याचा फैसला होणार आहे.
दोघांमधील आतापर्यंतच्या लढतींमध्ये सिंदारोव्हने २-० अशी आघाडी घेतली आहे. गुकेशला अद्याप त्याच्याविरुद्ध क्लासिकल प्रकारात विजय मिळवता आलेला नाही.