गुकेश भारताची शान : अभिजीत कुंटे

भारतासाठी तसेच बुद्धिबळ विश्वासाठी हा दिवस संस्मरणीय आणि तितकाच ऐतिहासिक आहे. २०२४ या वर्षाची यापेक्षा सुवर्णसांगता काय असू शकते. गेल्या असंख्य वर्षाच्या मेहनतीचे फळ गुकेशला मिळालेले आहे.
अभिजीत कुंटे,डी गुकेश (डावीकडून)
अभिजीत कुंटे,डी गुकेश (डावीकडून)
Published on

अभिजीत कुंटे

भारतासाठी तसेच बुद्धिबळ विश्वासाठी हा दिवस संस्मरणीय आणि तितकाच ऐतिहासिक आहे. २०२४ या वर्षाची यापेक्षा सुवर्णसांगता काय असू शकते. गेल्या असंख्य वर्षाच्या मेहनतीचे फळ गुकेशला मिळालेले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. देशातील बुद्धिबळप्रेमी वर्षानुवर्षे हा क्षण हृदयाच्या कोपऱ्यात सामावून ठेवतील.

चेस ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान मी भारतीय महिला संघाला मार्गदर्शन करत होतो. त्यावेळी आमचे वेळापत्रक पूर्ण व्यग्र असायचे. तरीही शक्य होईल तेव्हा मी गुकेशशी संवाद साधायचो. आशियाई स्पर्धेत जेव्हा गुकेश भेटला होता, त्यावेळी तो कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर होता. अनेकांनी त्याला कँडिडेट्स स्पर्धेतही कमी लेखले. मात्र त्याच्यातील क्षमता व बुद्धिमत्तेची मला पूर्ण जाणीव होती. गुकेशचे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचे कौशल्य अफाट आहे. इतक्या कमी वयात त्याच्याकडे असणारी प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे. असे खेळाडू क्वचितच सापडतात.

२०१२मध्ये आनंदने भारताकडून अखेरची जागतिक स्पर्धा जिंकली. त्यानंतर १२ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून गुकेशने जगभरात पुन्हा एकदा भारताचा तिरंगा फडकावला. एक गोष्ट गुकेशला अन्य बुद्धिबळपटूंपेक्षा वेगळी करते ती म्हणजे त्याचा व्यावसायिकपणा. पराभव झाला किंवा सामन्यात पिछाडीवर असला, तरी त्याच्या चेहऱ्यावरून ते कोणीही ओळखू शकत नाही. जोपर्यंत सामना पूर्णपणे जिंकत नाही, तोपर्यंत तो आनंद व्यक्त करणेही टाळतो. बाहेरच्या विश्वास काय चालू आहे अथवा आपला प्रतिस्पर्धी कसे हावभाव करत आहे, याकडे तो लक्ष देत नाही. त्याचे लक्ष फक्त बुद्धिबळाच्या पटावर असते. वर्षानुवर्षे आपल्या खेळात अधिक सुधारणा कशी करता येईल, यावरच गुकेशचा भर असतो.

भारताकडे गुकेशव्यतिरिक्त आर. प्रज्ञानंद, विदीत गुजराथी, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल, तानिया सचदेव असे असंख्य गु‌णवान बुद्धिबळपटू आहेत. बुद्धिबळ खेळ ऑलिम्पिकमध्ये कधी सहभागी होईल, हे सांगू शकत नाही. मात्र चेस ऑलिम्पियाड आणि जागतिक स्पर्धांमध्ये यापुढेही भारतीय खेळाडू दबदबा राखतील, हे ठामपणे सांगू शकतो.

२०२४ हे वर्ष भारतीय बुद्धिबळाचे कायापालट करणारे वर्ष ठरले. वर्षाच्या सुरुवातीला नागपूरच्या दिव्या देशमुखने कनिष्ठ गटाचे जागतिक जेतेपद मिळवले. त्यानंतर कँडिडेट्स स्पर्धेसाठी आपले ३ खेळाडू पात्र ठरले. त्यातून मग गुकेशने जागतिक लढतीची पात्रता मिळवली. सप्टेंबरमध्ये दुहेरी चेस ऑलिम्पियाड सुवर्णपदक पटकावून आपली ताकद संपूर्ण विश्वाला दाखवून दिली. मग आता गुकेशने १४ फेऱ्यांच्या कडव्या संघर्षानंतर लिरेनला चीतपट केले. त्यामुळे भारताचे बुद्धिबळातील वर्तमान व भविष्य फार उज्ज्वल असल्याची खात्री पटली.

(लेखक हे भारताचे बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in