६४ घरांचा राजा, गुकेशचा जगभरात गाजावाजा

भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजूने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी बुद्धिबळातील जगज्जेता ठरण्याचा पराक्रम केला.
६४ घरांचा राजा, गुकेशचा जगभरात गाजावाजा
Published on

सिंगापूर : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजूने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी बुद्धिबळातील जगज्जेता ठरण्याचा पराक्रम केला. सिंगापूरला झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत चेन्नईच्या गुकेशने चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनला १४व्या फेरीत धूळ चारून सर्वात युवा विश्वविजेता ठरण्याचा मान मिळवला. विश्वनाथन आनंदनंतर जगज्जेतेपद मिळवणारा गुकेश हा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला.

२५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सर्वप्रथम ७.५ गुणांपर्यंत पोहोचणारा खेळाडू जगज्जेता ठरतो. या लढतीच्या पहिल्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र दुसऱ्या फेरीत गुकेशने ३२ वर्षीय लिरेनला बरोबरीत रोखले. तिसऱ्या फेरीतील विजयासह गुकेशने त्याच्यातील कौशल्य दाखवून दिले. त्यानंतर मात्र १०व्या फेरीपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये सातत्याने बरोबरीच पाहायला मिळाली. रविवारी ११व्या फेरीत गुकेशने विजय मिळवला, तर सोमवारी १२व्या फेरीत लिरेनने बाजी मारून झोकात पुनरागमन केले. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा ६-६ गुणांची बरोबरी झाली होती. १३वी फेरीतही बरोबरीत सुटल्याने दोघांच्या खात्यात प्रत्येकी ६.५ गुण जमा होते.

गुरुवारी १४व्या फेरीत निकाल लागला नसता, तर शुक्रवारी टायब्रेकरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली असती. मात्र गुकेशने त्याचे सर्वस्व पणाला लावून ५८ चालींमध्ये लिरेनचा प्रतिकार मोडीत काढला. ४ तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या संघर्षात बाजी मारताच गुकेशला अश्रू अनावर झाले. गुकेश हा एकंदर जागतिक स्पर्धेतील १८वा विजेता ठरला. तसेच २०२६च्या जागतिक स्पर्धेसाठी तो थेट पात्र ठरला.

जागतिक लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरतो. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येते.

डिंगने गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला पराभूत करून बुद्धिबळाच्या विश्वातील पहिला चिनी जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली. त्यामुळे आधीपासूनच यावेळी गुकेशचे पारडे जड आहे, असे जाणकारांनी मत नोंदवले. गुकेशने हा विश्वास सार्थ ठरवला. गेल्या काही काळापासून गुकेश आनंदच्या मार्गदर्शनातच सराव करत आहे. त्यामुळे आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल ठेवून गुकेशने जगज्जेतेपद काबिज केले. त्यामुळे अवघ्या विश्वात आता गुकेशचा डंका आणि त्याचाच गाजावाजा सुरू आहे.

गुकेशच्या कारकीर्दीचा आढावा

२००६मध्ये जन्मलेल्या गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासूनच बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. त्याचे वडील रजनीकांत हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, तर आई डॉ. पद्मा ही जीवशास्त्र तज्ज्ञ आहे.

२०१३पासून शाळेतील बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहज जेतेपद मिळवू लागल्यावर गुकेशने या खेळातच कारकीर्द घडवण्याचे ठरवले. तेव्हापासून गुकेशने मागे वळून पाहिले नाही.

२०१५मध्ये ९ वर्षांखालील गटांत गुकेशने आशियाई शालेय स्पर्धा जिंकली. मग २०१८मध्ये १२ वर्षांखालील गटांत त्याने जागतिक युवा स्पर्धेचे जेतेपद काबिज केले. २०१८च्याच आशियाई युवा स्पर्धेत गुकेशने तब्बल ५ सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली.

२०१७पासून गुकेश वरिष्ठ गटात (खुल्या) खेळण्यास पात्र ठरला. २०१९मध्ये वयाच्या १२व्या वर्षीच त्याने विश्वातील सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरण्याचा मान मिळवला.

२०२१मध्ये मग विविध चॅलेंजर्स स्पर्धा जिंकून गुकेशने कामगिरीत सातत्य राखले. २०२२मध्ये चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत त्याने एकेरी गटात विजेतेपद पटकावले. त्याने या स्पर्धेत त्यावेळचा जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या फॅबियानो कारुआनालाही नमवले.

ऑक्टोबर २०२२मध्ये गुकेशने जलद बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का देत सर्वांचे लक्ष वेधले. कार्लसन हा त्यावेळचा जगज्जेता होता.

२०२३मध्ये गुकेशने भारताचा जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम खेळाडू ठरण्याचा मान मिळवताना आनंदला पिछाडीवर टाकले. त्यामुळेच गुकेश २०२४च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला.

मग २०२४मध्ये गुकेशने सर्वप्रथम कँडिडेट्स स्पर्धेत बाजी मारली. त्यानंतर भारतीय पुरुष संघाला ऑलिम्पियाड सुवर्ण जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आणि आता जागतिक जेतेपद मिळवून त्याने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

logo
marathi.freepressjournal.in