रोहित-द्रविडच्या सांगण्यावरूनच अंतिम सामन्यातील खेळपट्टीत बदल; वर्ल्डकप फायनलबाबत मोहम्मद कैफचे मत

त्यांच्या मध्यस्तीनंतरच एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कोरडी खेळपट्टी वापरण्यात आल्याचा दावा...
रोहित-द्रविडच्या सांगण्यावरूनच अंतिम सामन्यातील खेळपट्टीत बदल; वर्ल्डकप फायनलबाबत मोहम्मद कैफचे मत

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या योजना अचानक बदलताना खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या मध्यस्तीनंतरच एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कोरडी खेळपट्टी वापरण्यात आल्याचा दावा भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केला आहे.

गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने सलग १० सामने जिंकताना थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. या सामन्यासाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी कोरडी होती. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरेल असा अंदाज होता. परंतु ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय अखेर योग्य ठरला होता. या सामन्यादरम्यान कैफने समालोचन केले होते.

“अंतिम सामन्यापूर्वी सलग तीन दिवस रोहित शर्मा आणि राहुल द्रविड सायंकाळी येऊन तासभर खेळपट्टीची पाहणी करत होते. खेळपट्टीचा रंग दर दिवशी बदलल्याचे मी पाहिले होते. खेळपट्टीला जराही पाणी देण्यात आले नाही. त्यावर गवतही नव्हते. ऑस्ट्रेलियाकडे कमिन्स, स्टार्क यांच्यासारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे आपण संथ खेळपट्टी बनवू असा त्यांचा विचार होता. मात्र, अखेर त्यांचा हा निर्णय फसला,” असे कैफ एका मुलाखतीत म्हणाला.

“खेळपट्टी देखरेखकाराला (क्युरेटर) आम्ही त्यांचे काम करू देतो. खेळपट्टी बनवताना आम्ही मध्यस्ती करत नाही असे ‘लोक’ म्हणतात. मात्र, यात जराही तथ्य नाही. तुम्ही खेळपट्टीच्या आजूबाजूला घुटमळत होतात. त्यामुळे तुम्ही खेळपट्टी देखरेखकाराशी नक्कीच संवाद साधला असणार. ‘गवत कमी करा, पाणी कमी टाका’ या दोन ओळीही पुरेशा आहेत. यावरून तुम्हाला काय हवे आहे याची खेळपट्टी देखरेखकाराला कल्पना येते. यात काही चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. तुम्ही घरच्या मैदानावर खेळत आहात, तर त्याचा फायदा घेऊच शकता. मात्र, हा फायदाही त्यांना नीट करून घेता आला नाही,” असे रोहित आणि द्रविड यांना उद्देशून कैफ म्हणाला.

अंतिम सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना २३९ धावाच करता आल्या होत्या. मग ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ४३ षटकांतच गाठून विश्वचषक उंचावला.

logo
marathi.freepressjournal.in