जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा : साताऱ्याच्या पार्थचा ऐतिहासिक पराक्रम
लिमरिक (आयर्लंड) : साताऱ्याच्या पार्थ साळुंखेने सोमवारी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पार्थ हा पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे. १९ वर्षीय पार्थने भारतासाठी स्पर्धेतील अखेरचे सुवर्णपदक जिंकून धडाक्यात सांगता केली.
आयर्लंड येथे झालेल्या या स्पर्धेत २१ वर्षांखालील पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात भारताच्या पार्थने कोरियाच्या सातव्या मानांकित सोंग इन्जुनवर ७-३ (२६-२६, २५-२८, २८-२६, २९-२६, २८-२६) अशी पाच सेटमध्ये मात केली. पार्थने पात्रता फेरीतसुद्धा अग्रस्थान पटकावून अंतिम फेरी गाठली होती. एकवेळ तो अंतिम लढतीतही पिछाडीवर होता. मात्र तरीही त्याने विजय मिळवला.
त्याशिवाय महिलांच्या २१ वर्षांखालील गटात भाजा कौरने भारतासाठी कांस्यपदक कमावले. तिने चायनीज तैपईच्या सू-सिन यू हिच्यावर ७-१ (२८-२५, २७-२७, २९-२५, ३०-२६) असे वर्चस्व गाजवले. भारतासाठी रविवारी साताऱ्याची अदिती स्वामी आणि प्रियांश यांनीही विविध प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.
पार्थने सिंगापूर येथे जून महिन्यात झालेल्या आशिया चषकात रौप्यपदकावर मोहोर उमटवली होती. त्याने गतवर्षी शारजा येथेही कांस्यपदकावर निशाणा साधला. आता आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झालेली असली, तरी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेसाठी पार्थ नक्कीच भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवू शकतो.
११ पदकांसह भारत दुसऱ्या स्थानी
भारताने या स्पर्धेत एकूण ११ पदकांना गवसणी घातली. यामध्ये ६ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्यपदकांचा समावेश आहे. मात्र पदकतालिकेत कोरियापेक्षा १ अधिक पदक पटकावूनही भारतीय संघ दुसऱ्या स्थानी राहिला. कोरियाने ६ सुवर्ण व ४ रौप्यपदके जिंकली. त्यामुळे त्यांनी पदकतालिकेत अग्रस्थान काबिज केले.
सातत्याने योगा तसेच प्राणायम केल्यामुळे मला फार लाभ झाला. माझी स्पर्धा विश्वातील कोणत्या क्रमांकावरील खेळाडूशी आहे, याचा कधीच विचार न करता स्वत:च्या कामगिरीवर मी लक्ष केंद्रित करतो. भारतासाठी यापुढेही आणखी पदके जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे.
- पार्थ साळुंखे
पार्थचा प्रवास
- पार्थचे वडील सुशांत हे साताऱ्यातील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
-प्रविण सांवत यांनी २०१८-१९मध्ये पार्थमधील कौशल्य हेरले. त्यानंतर पार्थने सोनीपत येथील -भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातील राम अवदेश यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रवास सुरू केला.
- महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात दीपिका कुमारीने २००९ आणि २०११मध्ये अनुक्रमे कॅडेट व युवा -गटात सुवर्णपदक जिंकले होते. २०१९ व २०२१मध्ये कोमालिका बारीनेसुद्धा अशीच कामगिरी केली.
- मात्र पुरुषांमध्ये युवा स्पर्धेतच रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक कमावणारा पार्थ हा पहिलाच भारतीय ठरला.