

युजीन : राष्ट्रीय विक्रमवीर उंच उडीपटू पूजा सिंगला अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयश आले. तिला अंतिम फेरीत सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे जागतिक युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला २ रौप्य व १ कांस्य अशा ३ पदकांवरच समाधान मानावे लागले.
भारतासाठी रविवारी उंच उडीत बसंत कुमारने रौप्य, तर लांब उडीत शाहनवाझ खानने कांस्यपदक जिंकले होते. शुक्रवारी आशिष यादव याने भालाफेकीत रौप्यपदक जिंकले होते. यासह भारताने २०२१ आणि २०२२ च्या आवृत्तीतील एकूण तीन पदकांच्या कामगिरीची बरोबरी केली. २००२ ते २०२८ दरम्यान भारताने या स्पर्धेत एकूण चार पदके जिंकली होती, ज्यामध्ये नीरज चोप्रा आणि हिमा दास यांच्या सुवर्णपदकांचा समावेश होता, तर २०२४ मध्ये भारताने एक पदक जिंकले होते.
दरम्यान, सोमवारी १९ वर्षांची पूजा १.८४ मीटर इतकीच उंची गाठू शकली, जी तिच्या १.९३ मीटरच्या वरिष्ठ राष्ट्रीय विक्रमापेक्षा खूपच कमी होती. तीन प्रयत्नांतही तिला १.८७ मीटरची उंची ओलांडता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या इझोबेले लुईसन-रो हिने १.९२ मीटरसह सुवर्णपदक जिंकले, तर हंगेरीच्या लिलियाना बातोरी (१.९० मीटर) आणि स्पेनच्या ऐताना अलोन्सो (१.९० मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. मे महिन्यात पूजाने आशियाई युवा स्पर्धेत १.९३ मीटरच्या राष्ट्रीय विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले होते. ती वरिष्ठ आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेतीही आहे.
दरम्यान, भारतीय महिला ४ बाय ४०० मीटर रिले संघ अंतिम फेरीत ३ मिनिटे ४५.२८ सेकंद अशी वेळ नोंदवून नवव्या आणि अंतिम स्थानावर राहिला. या संघात भूमिका नेहाते, तहुरा खातून, तनू चौधरी आणि थिया अरुमुगम यांचा समावेश होता. अमेरिकेने ३:२९.१५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर ऑस्ट्रेलिया (३:३१.३९) आणि ग्रेट ब्रिटन (३:३२.०८) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
थाळीफेकपटू सीमा अंतिल हिने २००२ मधील जमैका आवृत्तीत रौप्यपदक जिंकून भारताचे या स्पर्धेतील पहिले पदक जिंकले होते, तर नवजीत कौर ढिल्लाँ हिने २०१४ मध्ये अमेरिकेत कांस्यपदक जिंकले होते. २०२१ मध्ये अमित (१०,००० मीटर चालणे) आणि शैली सिंग (महिला लांब उडी) यांनी प्रत्येकी एक रौप्य जिंकले.