WPL 2023 : पंचतारांकित विजयासह मुंबई बाद फेरीत; हरमनप्रीतची कर्णधार खेळी

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतच्या अर्धशतकामुळे गुजरातवर ५५ धावांनी वर्चस्व
WPL 2023 : पंचतारांकित विजयासह मुंबई बाद फेरीत; हरमनप्रीतची कर्णधार खेळी

कर्णधार हरमनप्रीत कौरने (३० चेंडूंत ५१ धावा) साकारलेल्या आणखी एका धडाकेबाज खेळीमुळे मुंबई इंडियन्सने दिमाखात महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) बाद फेरीत धडक मारली. मुंबईने गुजरात जायंट्सचा ५५ धावांनी पराभव करून सलग पाचव्या विजयाची नोंद करतानाच गुणतालिकेतील अग्रस्थान भक्कम केले.

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. हरमनप्रीतने ७ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक झळकावतानाच चौथ्या विकेटसाठी अमेलिया करसह (१९) ५१ धावांची भागीदारी रचली. त्यापूर्वी, नॅट शीव्हर-ब्रंट (३६) आणि यास्तिका भाटिया (४४) यांनीही दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भर घातल्यामुळे मुंबईने दीडशे धावांचा टप्पा गाठला.

लक्ष्याचा पाठलाग करताना मध्यमगती गोलंदाज ब्रंट आणि ऑफस्पिनर मॅथ्यूजपुढे गुजरातची फलंदाजी ढेपाळली. त्यांनी २० षटकांत जेमतेम ९ बाद १०७ धावा केल्या. हरलीन देओलने गुजरातकडून सर्वाधिक २२ धावा केल्या. त्यांचे सात फलंदाज दोन आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. गुजरातचा हा पाच सामन्यांतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे त्यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत. दुसरीकडे मुंबईने गुजरातचा धुव्वा उडवूनच हंगामाला प्रारंभ केला होता. आता त्यांनी गुजरातला पुन्हा धूळ चारून सर्वात प्रथम बाद फेरी गाठण्याचा मान मिळवला. हरमनप्रीतने स्पर्धेत आतापर्यंत ३ अर्धशतके झळकावली असून, या तिन्ही वेळेस तिने सामनावीर पुरस्कारही पटकावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in