WPL 2024 : मुंबई इंडियन्स अग्रस्थानी; ब्रंट, अमेलियामुळे बंगळुरूवर ७ गडी राखून वर्चस्व

कर्णधार नॅट शीव्हर-ब्रंट (२ बळी आणि २७ धावा) व अष्टपैलू अमेलिया कर (२४ चेंडूंत नाबाद ४० धावा) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या बळावर...
WPL 2024 : मुंबई इंडियन्स अग्रस्थानी; ब्रंट, अमेलियामुळे बंगळुरूवर ७ गडी राखून वर्चस्व

बंगळुरू : कर्णधार नॅट शीव्हर-ब्रंट (२ बळी आणि २७ धावा) व अष्टपैलू अमेलिया कर (२४ चेंडूंत नाबाद ४० धावा) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या बळावर मुंबई इंडियन्सने महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७ गडी आणि २९ चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ६ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार स्मृती मानधना (९), सोफी डिवाईन (९), शब्बीनी मेघना (११), रिचा घोष (७) यांनी निराशा केली. मात्र अनुभवी एलिस पेरीने ३८ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा फटकावल्या. तिला जॉर्जिया वेरहॅमने (२७) उत्तम साथ दिली. मुंबईकडून ब्रंट व पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका भाटिया (१५ चेंडूंत ३१) आणि हायली मॅथ्यूज (२१ चेंडूंत २६) यांनी ४ षटकांतच ४५ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर ब्रंट व अमेलिया यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भर घातली. अमेलियाने ७ चौकारांसह १५.१ षटकांतच मुंबईचा विजय साकारला. ४ सामन्यांतील ३ विजयांच्या सहा गुणांसह मुंबई अग्रस्थानी आहे.

दिल्लीच्या विजयात ऑस्ट्रेलियन खेळाडू चमकले

कर्णधार मेग लॅनिंगने (४१ चेंडूंत ५५) साकारलेल्या आणखी एका अर्धशतकाला डावखुरी फिरकीपटू जेस जोनासनच्या (२२ धावांत ३ बळी) गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चमक दाखवल्याने दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला २५ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ८ बाद १६३ धावा केल्या. लॅनिंगने ६ चौकार व १ षटकारासह अर्धशतक साकारले. तिला एलिस कॅप्सी (२७) आणि सदरलँड (२०) यांचीही सुरेख साथ लाभली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ॲश्लेघ गार्डनरच्या (४०) झुंजीनंतरही गुजरातला ८ बाद १३८ धावाच करता आल्या. राधा यादवनेसुद्धा २० धावांत ३ गडी बाद केले. गुजरातचा हा सलग चौथा पराभव ठरला.

logo
marathi.freepressjournal.in