

नवी दिल्ली : भारताची तारांकित अष्टपैलू दीप्ती शर्मावर यंदाच्या लिलावातील सर्वाधिक बोली लावण्यात आली. महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) चौथ्या हंगामासाठी यूपी वॉरियर्स संघाने विश्वविजेत्या भारताची खेळाडू दीप्तीला ३.२० कोटी रुपयांत खरेदी केले. नवी दिल्ली येथे महिलांचे मेगा ऑक्शन उत्साहात पार पडले.
आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये मुंबई इंडियन्सने, तर २०२४मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. आता ३ वर्षांनी सर्व संघांचा चेहरा बदलणार आहे. त्यामुळे लिलावापूर्वी सर्व खेळाडूंनी प्रत्येकी ४-५ खेळाडू कायम राखले होते. गुरुवारी झालेल्या लिलावात सर्व संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. एकूण २७७ खेळाडू या लिलावाच्या रिंगणात उतरले. त्यामध्ये १९४ भारतीय, तर ८३ विदेशी खेळाडू होते.
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या महिलांच्या विश्वचषकात दीप्तीने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावून भारताला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २८ वर्षीय दीप्तीला दिल्लीने ५० लाख रुपयांत खरेदी केले. मात्र गतवर्षी दीप्ती यूपीकडून खेळत होती. त्यामुळे त्यांना ‘राइट टू मॅच’चा पर्याय देण्यात आला. यूपीने त्याचा लाभ घेतला. मग दिल्लीने ३.२० कोटी रुपये रक्कम वाढवली. यूपीने त्यास होकार दर्शवत दीप्तीला संघात शामील केले.
त्याशिवाय न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया कर (३ कोटी), वेगवान गोलंदाज शिखा पांडे (२.४० कोटी) या खेळाडूंना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची बोली लागली. अमेलियाला मुंबई इंडियन्सने, तर शिखाला यूपीने ताफ्यात घेतले. प्रत्येक संघाला किमान १५ ते कमाल १८ खेळाडू संघात घेण्याची मुभा होती. त्यांपैकी मुंबई, बंगळुरू व दिल्लीने प्रत्येकी १६, तर यूपी व गुजरात यांनी १८ खेळाडू खरेदी केले. आता जानेवारीपासून रंगणाऱ्या डब्ल्यूपीएलकडे लक्ष असेल.
ऑक्शननंतर सर्व संघांवर टाकलेली एक नजर
-मुंबई इंडियन्स (१६ खेळाडू) : हरमनप्रीत कौर, नॅट शीव्हर ब्रंट, अमेलिया कर, हायली मॅथ्यूज, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनिम इस्माइल, गुनालन कमलिनी, साईका इशाक, निकोला कॅरी, त्रिवेणी वशिष्ठ, संस्कृती गुप्ता, नल्ला रेड्डी, मिली इलिंगवर्थ, पूनम खेमनार, राहिला फिरदोस.
-दिल्ली कॅपिटल्स (१६ खेळाडू) : शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, ॲनाबेल सदरलँड, मॅरीझेन काप, श्री चरिणी, चिनेल हेन्री, लॉरा वोल्वर्ड, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, तानिया भाटिया, लिझेल ली, नंदिनी शर्मा, दीया यादव, लुसी हॅमिल्टन, ममता मडिवाला.
-गुजरात जायंट्स (१८ खेळाडू) : बेथ मूनी, ॲश्लेघ गार्डनर, सोफी डिवाईन, जॉर्जिया वेरहॅम, भारती फुलमाली, काशवी गौतम, रेणुका सिंग, यास्तिका भाटिया, किम गार्थ, डॅनिएल व्हॅट, अनुष्का शर्मा, तनुजा कन्वर, राजेश्वरी गायकवाड, कनिका अहुजा, तिथास साधू, आयुषी सोनी, हॅप्पी कुमारी, शिवानी सिंग.
-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१६ खेळाडू) : स्मृती मानधना, रिचा घोष, एलिस पेरी, लॉरेन बेल, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, ग्रेस हारिस, राधा यादव, नडिन डी क्लर्क, श्रेयांका पाटील, जॉर्जिया वॉल, दयालन हेमलता, लिन्सी स्मिथ, प्रेमा रावत, गौतमी नाईक, कुमार प्रत्युषा.
-यूपी वॉरियर्स (१८ खेळाडू) : दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मेग लॅनिंग, फोबे लिचफील्ड, आशा शोबना, सोफी एक्केलस्टोन, दिएंड्रा डॉटिन, किरण नवगिरे, क्रांती गौड, प्रतिका रावल, श्वेता सेहरावत, हरलीन देओल, क्लो ट्रायन, शिप्रा गिरी, सिमरन शेख, त्रिशा घोंगडी, सुमन मीना, तारा नॉरिस.