

नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या चौथ्या पर्वासाठी आज (दि.२७) नवी दिल्ली येथे मेगा ऑक्शन म्हणजेच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. दुपारी ३.३० वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्सवर हा लिलाव पाहता येईल.
आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये मुंबई इंडियन्सने, तर २०२४मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. आता ३ वर्षांनी सर्व संघांचा चेहरा बदलणार आहे. त्यामुळे लिलावापूर्वी सर्व खेळाडूंनी प्रत्येकी ४-५ खेळाडू कायम राखले होते. आता गुरुवारी होणाऱ्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष असेल. एकूण २७७ खेळाडू या लिलावाच्या रिंगणात उतरतील. त्यामध्ये १९४ भारतीय, तर ८३ विदेशी खेळाडू आहेत. त्यांपैकी ७३ खेळाडूंवरच बोली लावण्यात येईल. तसेच यांपैकी २३ खेळाडूच विदेशी असतील.
WPL मेगा लिलावात सर्वांचे लक्ष विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर असेल. लिलावासाठीची सर्वोच्च बेस प्राईस ₹५० लाख आहे, ज्यामध्ये विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अष्टपैलू दीप्ती शर्मा आघाडीवर आहे. दीप्तीसाठी मोठी बोली लागण्याची अपेक्षा आहे. यूपी वॉरियर्सने दीप्तीला आधीच करारमूक्त केले असल्यामुळे आता सर्व संघ तिला करारबद्ध करण्यासाठी प्रयत्न करतील.
४० लाख रुपये बेस प्राईस असलेल्या किरण नवगिरेवरही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. किरणच्या पॉवर-हिटिंगचा विचार करता, तिच्यासाठी संघांमध्ये स्पर्धा दिसू शकते. वेगवान गोलंदाज क्रांती गौड, फिरकी गोलंदाज श्री चरणी आणि अष्टपैलू स्नेह राणा यांना ३० लाख रुपये या मूळ किमतीत यादीत स्थान देण्यात आले आहे. फ्रँचायझी त्यांच्यासाठीही मोठी बोली लावतील अशी अपेक्षा आहे. युवा डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माची मूळ किंमत १० लाख रुपये आहे. वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे, यावेळी तिच्यावरही चांगली बोली लागण्याची अपेक्षा आहे. सोफी डिवाईन, एलिसा हीली, अमेली कार, मेग लॅनिंग, लॉरा वोल्वर्ड, या सुपरस्टार खेळाडूंवरही लिलावात लक्ष असेल.
पाचही संघांची रिटेन्शन लिस्ट
मुंबई इंडियन्स (एमआय) – हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, नॅट सीवर ब्रंट, जी कमालिनी
दिल्ली कॅपिटल्स (डीसी) – अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, निकी प्रसाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) – स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष, श्रेयंका पाटील
गुजरात जायंट्स (जीजी) – अॅशले गार्डनर, बेथ मुनी
यूपी वॉरियर्स (यूपीडब्ल्यू) – श्वेता सेहरावत