
मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने शनिवारी रात्री वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) म्हणजेच महिलांच्या आयपीएलचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. ऐतिहासिक ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर ८ धावांनी सरशी साधली. हरमनप्रीतने या विजयाचे श्रेय प्रामुख्याने गोलंदाजांना दिले. तर दिल्लीला मात्र सलग तिसऱ्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
२०२३मध्ये मुंबईने दिल्लीलाच नमवून डब्ल्यूपीएलच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर २०२४मध्ये बंगळुरूने दिल्लीला धूळ चारून दुसरा हंगाम जिंकला. आता तिसऱ्या हंगामात तरी अंतिम फेरी गाठल्यावर दिल्ली उपविजेतेपदाची मालिका संपुष्टात आणेल, अशी आशा होती. त्यातच पॉवरप्लेमध्ये मुंबईला ६ षटकांत २ बाद फक्त २० धावा करता आल्या. त्यामुळे दिल्लीचा संघ मुंबईला लवकर गुंडाळून यंदा जेतेपद मिळवणार, असेच सर्वांना वाटले.
मात्र तेथून मुंबईने सामन्याला कलाटणी दिली. किंबहुना दिल्लीने मुंबईला हलक्यात घेत त्यांना पुनरागमन करण्याची संधी दिली, असेही म्हणू शकतो. हरमनप्रीतने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ४४ चेंडूंत ६६ धावा फटकावल्या. तिने ९ चौकार व २ षटकारांची आतषबाजी करतानाच नॅट शीव्हर ब्रंटसह (३०) तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईने २० षटकांत ७ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारली.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीसाठी मुंबईच्या गोलंदाजांनी हे आव्हान कठीण केले. कर्णधार मेग लॅनिंग (१३), शफाली वर्मा (४) पॉवरप्लेमध्येच बाद झाल्याने दिल्लीवर दडपण आले. मग लेगस्पिनर अमेलिया करने जेस जोनासन (१३), जेमिमा रॉड्रिग्ज (३०) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. मॅरीझेन कापने २६ चेंडूंत ४० धावांची झुंज देत सामन्यात चुरस निर्माण केली. मात्र भरवशाच्या ब्रंटने १८व्या षटकात काप आणि शिखा पांडेचा अडसर दूर करून मुंबईचा विजय पक्का केला. दिल्लीला २० षटकांत ९ बाद १४१ धावाच करता आल्या. हरमनप्रीत सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
“फलंदाजीत आम्ही आणखी १५ ते २० धावा करणे अपेक्षित होते. मात्र धावांचा पाठलाग करणे कठीण जाईल, याची कल्पना होती. गोलंदाजांनी ज्याप्रकारे पॉवरप्लेमध्ये मारा केला, ते कौतुकास्पद होते. त्यामुळे आव्हान १८० धावांचे असल्यासारखे वाटले. ब्रंट, शबनिम इस्माईल, अमेलिया यांचे विशेष कौतुक. अंतिम फेरीचे दडपण न बाळगता गोलंदाजांनी कामगिरी उंचावली,” असे हरमनप्रीत म्हणाली.
“ब्रेबॉर्नवर यापूर्वीच्या तिन्ही सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघच जिंकला. त्यामुळे नाणेफेक गमावून जेव्हा प्रथम फलंदाजीसाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी आम्ही १७० ते १८० धावांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र अंतिम फेरीतील खेळपट्टी वेगळी होती. दिल्लीने सुरेख गोलंदाजी करून आमच्यावर दडपण आणले. मी ज्यावेळी फलंदाजीस गेली, तेव्हा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नसल्याचे जाणवले. मात्र थोडा वेळ थांबल्यावर फटके खेळणे गरजेचे होते,” असेही हरमनप्रीतने नमूद केले.
मुंबईने तीन हंगामांत दुसऱ्यांदा जेतेपद मिळवून पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच महिलांमध्येही आपण सरस असल्याचे दाखवून दिले. पुढील वर्षी मेगा ऑक्शन होणार असल्याने या संघांमधील काही खेळाडू अन्य संघांत खेळताना दिसू शकतात. मात्र तूर्तास १४ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत रंगलेल्या यंदाच्या डब्ल्यूपीएलला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
एका भागीदारीची कमतरता; मात्र मुंबईला श्रेय : लॅनिंग
संपूर्ण स्पर्धेत आम्ही उत्तम खेळ केला. मात्र अंतिम फेरीत निर्णायक क्षणी कामगिरी उंचावण्यात अपयशी पडल्याचे दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने मान्य केले. तसेच तिने मुंबईचेही कौतुक केले. “मुंबईने आम्हाला बॅकफूटवर ढकलले. ते खरे हकदार आहेत. कदाचित मधल्या षटकांत आणखी एखादी २०-२५ धावांची भागीदारी झाली असती, तर नक्कीच सामन्याचा निकाल वेगळा असता. हा पराभव पचवणे कठीण आहे. मात्र चुकांमधून धडा घेत आपण पुढे जाणे गरजेचे आहे,” असे लॅनिंग म्हणाली.
चाहत्यांची गर्दी आणि तारांकितांची उपस्थिती
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) म्हणजेच ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई-दिल्ली यांच्यातील अंतिम लढतीसाठी चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली. २० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये शनिवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार १४,७०० चाहते उपस्थित होते. तसेच अंतिम सामना शानदार सोहळ्यामुळे अर्धा तास विलंबाने सुरू झाला. सामन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि अन्य काही कलाकारांनी नृत्य सादर केले. त्याशिवाय मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघातील खेळाडू व प्रशिक्षक फळीने आपल्या महिला संघाला पाठिंबा देण्यासाठी ब्रेबॉर्न गाठले होते. यामध्ये महेला जयवर्धने, लसिथ मलिंगा, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, दीपक चहर यांचा समावेश होता. यंदा महिलांसाठीही तिकीट ठेवण्यात आले होते. मात्र तरीही स्टेडियमबाहेर उत्साही महिला चाहत्यांची गर्दी दिसून आली. आता या स्पर्धेद्वारे गवसलेल्या खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधून भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये मायदेशातच रंगणाऱ्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद मिळवले, हीच आशा तमाम भारतीय बाळगून आहेत.
वैयक्तिक पुरस्कार विजेते
-अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडू : हरमनप्रीत कौर (६६ धावा)
-स्पर्धेत सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप) : नॅट शीव्हर ब्रंट (५२३ धावा)
-स्पर्धेत सर्वाधिक बळी (पर्पल कॅप) : अमेलिया कर (१८ बळी)
-स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : नॅट शीव्हर ब्रंट (५२३ धावा, १२ बळी)
-स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू : अमनजोत कौर (मुंबई)
-स्पर्धेतील सर्वोत्तम झेल : ॲनाबेल सदरलँड (दिल्ली)
-स्पर्धेत सर्वाधिक षटकार : ॲश्लेघ गार्डनर (१८ षटकार)
-स्पर्धेत सर्वाधिक डॉट बॉल : शबनिम इस्माईल (१३१ चेंडू)
-फेअर प्ले संघ : गुजरात जायंट्स