महिला आयपीएल स्पर्धा : विजय यूपीचा, आगेकूच मुंबईची

वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) म्हणजेच महिलांच्या आयपीएलमध्ये यूपी वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १२ धावांनी पराभव केला.
महिला आयपीएल स्पर्धा : विजय यूपीचा, आगेकूच मुंबईची
एक्स @wplt20
Published on

लखनऊ : वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) म्हणजेच महिलांच्या आयपीएलमध्ये यूपी वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १२ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स या संघांचे बाद फेरीतील स्थान पक्के झाले.

इकाना स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना यूपीने २० षटकांत ५ बाद २२५ धावांचा डोंगर उभारला. जॉर्जिया वॉलने ५६ चेंडूंत नाबाद ९९ धावा फटकावताना १७ चौकारांची आतषबाजी केली. तिला ग्रेस हॅरिस (३९), किरण नवगिरे (४६) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे यूपीने बंगळुरूपुढे २२६ धावांचे लक्ष्य ठेवले.

मात्र बंगळुरूचा संघ १९.३ षटकांत २१३ धावांत गारद झाला. रिचा घोषने ३३ चेंडूंत ६९ धावांची तुफानी खेळी साकारली. मात्र अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने बंगळुरूला सलग चौथा पराभव पत्करावा लागला. स्मृती मानधना (४), एलिस पेरी (२८), राघवी बिश्त (१४) यांनी निराशा केली.

गुणतालिकेत दिल्ली १० गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर गुजरात व मुंबई यांचा क्रमांक लागतो. यूपीचे आठही सामने झाले असून ते ६ गुणांवरच राहिल्याने त्यांचे व अखेरच्या स्थानावरील बंगळुरूचे (४ गुण) आव्हान संपुष्टात आले.

सोमवार, १० तारखेपासून मुंबईतील सीसीआय म्हणजेच ब्रेबॉर्न स्टेडियमवरील सामन्यांना सुरुवात होईल. शनिवार, १५ तारखेला मुंबईतच अंतिम सामना खेळवण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in