

बडोदा : स्मृती मानधनाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी महिलांच्या प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) अंतिम फेरी गाठली. त्यांनी अखेरच्या साखळी लढतीत यूपी वॉरियर्सला ८ गडी व ४१ चेंडू राखून धूळ चारली. त्यामुळे त्यांनी गुणतालिकेत अग्रस्थान पक्के केले.
बडोदा येथील कोटंबी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मध्यमगती गोलंदाज नॅडिन डी क्लर्क (२२ धावांत ४ बळी) व ग्रेस हॅरिस (३७ चेंडूंत ७५ धावा), स्मृती (२७ चेंडूंत नाबाद ५४ धावा) यांनी शानदार अर्धशतके झळकावून छाप पाडली. प्रथम फलंदाजी करताना यूपीने २० षटकांत ८ बाद १४३ धावा केल्या. मात्र बंगळुरूने १३.१ षटकांतच हे लक्ष्य गाठले. आता उर्वरित दोन स्थानांसाठी दिल्ली, मुंबई, गुजरात यांच्यात चुरस असेल. यूपीचे आव्हान संपुष्टात आले आहे. शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात लढत होईल.
दरम्यान, यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या दृष्टीने ही डब्ल्यूपीएल निर्णायक ठरेल.
२ नोव्हेंबर, २०२५ रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने विश्वचषक उंचावला. त्यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना उपांत्य व अंतिम सामन्यात धूळ चारली. या ऐतिहासिक यशानंतर महिला क्रिकेटचे रूप पालटले असून चोहीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे. आता डब्ल्यूपीएलमध्ये युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणखी एक संधी मिळेल.
आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबईने, तर २०२४मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी दोन हंगामांमध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना झाला.