

मुंबई : २०२३चा एकदिवसीय विश्वचषक भारताला जिंकवून देण्यात महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे मोलाचे योगदान होते. तसेच २०२६च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही आगामी डब्ल्यूपीएल निर्णायक असेल, असे स्पष्ट मत भारतीय महिला संघाची तसेच मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले.
यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात महिलांची आयपीएल म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व रंगणार आहे. त्या निमित्ताने बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेसाठी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत, मुख्य प्रशिक्षक लिसा कीटली, मार्गदर्शक व गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामी उपस्थित होते. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत गतविजेत्या मुंबईची सलामीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ही लढत होईल. मुंबईने २०२३ व २०२५मध्ये हरमनच्याच नेतृत्वात डब्ल्यूपीएल जिंकली. तर २०२४मध्ये बंगळुरूने बाजी मारली होती.
२ नोव्हेंबर रोजी हरमनच्या कर्णधारपदाखाली विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघ दीड महिना विश्रांतीवर होता. काही दिवसांपूर्वी बहुतांश खेळाडू एका खेळाडूच्या खासगी कार्यक्रमातही एकत्रित दिसले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महिला संघाची भेट घेत त्यांचे कौतुक केले. एकूणच महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले असून हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे.
त्यानंतर डिसेंबरच्या अखेरीस महिला संघ पुन्हा क्रिकेटकडे वळला. श्रीलंकेविरुद्ध भारताने टी-२० मालिकेत ५-० असे यश संपादन केले. आता महिला संघासाठी लकी ठरलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे आता महिला संघाचे लक्ष टी-२० सामन्यांवर अधिक असेल.
“मुंबईत खेळायला मला फार आवडते. येथील डी. वाय. पाटील, ब्रेबॉर्न स्टेडियम माझ्या आवडीची आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच सुरुवात मुंबईत करताना आतुर आहे,” असे हरमनप्रीत म्हणाली. “कोणतीही स्पर्धा असली, तरी त्यामध्ये फक्त सहभागी न होता ती जिंकण्याचेच माझे लक्ष्य असते. मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवल्यापासून माझ्यात फार बदल झाले. याचा फायदा मला विश्वचषकात भारताचे नेतृत्व करतानाही झाला,” असे हरमनप्रीतने सांगितले. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात डब्ल्यूपीएलद्वारे गवसलेल्या खेळाडूंनी छाप पाडली. आता २०२६च्या टी-२० विश्वचषकासाठीसुद्धा ही स्पर्धा तयारीच्या दृष्टीने मोलाची ठरेल, असे हरमनप्रीत म्हणाली.
“भारताकडे अफाट गुणवत्ता आहे. डब्ल्यूपीएल हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवताना दिसेल. लिलावात आम्ही आमचे जुने खेळाडू पुन्हा विकत घेण्यास प्राधान्य दिले. कारण ३ पर्वांमध्ये २ वेळा जेतेपद मिळवणे सोपे नसते. यंदाही आम्ही सर्वोत्तम खेळाडूंसह मैदानात उतरू,” असे प्रशिक्षक लिसा यांनी सांगितले. एकूणच आता डब्ल्यूपीएलच्या चौथ्या पर्वात मुंबईला रोखण्याचे आव्हान अन्य संघांसमोर असेल.
प्रशिक्षक फळीत सर्व महिलाच
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकीय चमूत फक्त महिलांचाच समावेश आहे. डब्ल्यूपीएलमध्ये प्रथमच एखाद्या संघाच्या ताफ्यात फक्त महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी मुंबईच्या मुख्य प्रशिक्षक लिसा यांनी संघमालक नीता अंबानी यांचेही आभार मानले. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षकपद ऑस्ट्रेलियाच्या लिसा भूषवत आहेत. भारताची माजी क्रिकेटपटू झुलन गेल्या तीन हंगामांपासून या संघाची गोलंदाजी प्रशिक्षक आहे. यंदा तिच्याकडे मार्गदर्शकाची सूत्रेसुद्धा सोपवण्यात आली आहेत. देविका पळशीकर फलंदाजी प्रशिक्षक आहेत. निकोल बोल्टन क्षेत्ररक्षणात, तर कर्स्टन बीम्स फिरकी विभागात संघाला मार्गदर्शन करणार आहेत.