WPL : जेतेपदासाठी आज दिल्ली-बंगळुरूत महामुकाबला

महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील.
WPL : जेतेपदासाठी आज दिल्ली-बंगळुरूत महामुकाबला
WPL : जेतेपदासाठी आज दिल्ली-बंगळुरूत महामुकाबलाPhoto : X
Published on

बडोदा : एकीकडे युवा विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठलेली असतानाच गुरुवारी क्रीडाप्रेमींना आणखी एका महाअंतिम मुकाबल्याचा आनंद लुटता येणार आहे. महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येतील. बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणारा दिल्लीचा संघ पहिले जेतेपद मिळवणार की, बंगळुरू २०२४नंतर पुन्हा विजेता ठरणार, हे पाहणे रंजक ठरेल.

यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात आले. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या दृष्टीने ही डब्ल्यूपीएल निर्णायक ठरत आहे.

२ नोव्हेंबर, २०२५ रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने विश्वचषक उंचावला. त्यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना उपांत्य व अंतिम सामन्यात धूळ चारली. या ऐतिहासिक यशानंतर महिला क्रिकेटचे रूप पालटले असून चोहीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे. आता डब्ल्यूपीएलमध्ये युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणखी एक संधी मिळाली.

आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबईने, तर २०२४मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी दोन हंगामांमध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना झाला, तर एकदा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर महाअंतिम लढत रंगली. मुख्य म्हणजे यापूर्वीच्या तिन्ही हंगामात दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना दर वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने साखळी फेरीत सर्वाधिक ६ विजयांच्या १२ गुणांसह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. तर जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने ८ गुणांसह तिसरे स्थान मिळवून आगेकूच केली. एलिमिनेटर लढतीत दिल्लीने गुजरातला धूळ चारली. मुख्य म्हणजे डब्ल्यूपीएलमध्ये आजवर अग्रस्थानावरील संघ कधीच स्पर्धा जिंकलेला नाही. त्यामुळे बंगळुरूला इतिहास बदलण्याची संधी आहे. तर दिल्लीचा संघ २०२४च्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा घेण्यास आतुर असेल. एलिमिनेटर जिंकलेल्या संघानेच तिन्ही वर्ष डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवलेले आहे. त्यामुळे दिल्लीच्या बाजूने इतिहास आहे.

जेमिमासह लॉरा वोल्वर्ड, लीझेल ली, मॅरीझेन काप, नंदिनी शर्मा, श्री चरिणी या खेळाडूंवर दिल्लीची भिस्त आहे. मुख्य म्हणजे साखळी फेरीत सुरुवातीच्या चारपैकी दिल्लीने एकच लढत जिंकली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांनी कामगिरी उंचावली. दुसरीकडे बंगळुरूची मदार स्मृतीसह सलामीवीर ग्रेस हॅरिस, लॉरेन बेल, रिचा घोष, नडीन डी क्लर्क यांच्यावर आहे. बंगळुरूने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ केला आहे. मात्र गेल्या आठवडाभरात ते एकही लढत खेळलेले नाहीत. नवी मुंबईतील टप्प्यात त्यांनी चार लढती जिंकल्या, तर बडोदा येथे त्यांना दोन लढती गमवाव्या लागल्या.

एकूणच दोन्ही संघांत दर्जेदार खेळाडूंचा भरणा असल्याने कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in