ब्रेबॉर्नवर आज महिलांचा महामुकाबला; तिसऱ्या प्रयत्नात WPL जिंकण्यासाठी दिल्ली उत्सुक; मुंबईचे दुसऱ्या जेतेपदाचे ध्येय

Mi vs DC WPL Final : पुरुषांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा महासंग्राम भारताने जिंकल्यानंतर आता शनिवारी मुंबईत महिलांमध्ये महामुकाबला रंगणार आहे.
ब्रेबॉर्नवर आज महिलांचा महामुकाबला; तिसऱ्या प्रयत्नात WPL जिंकण्यासाठी दिल्ली उत्सुक; मुंबईचे दुसऱ्या जेतेपदाचे ध्येय
Published on

मुंबई : पुरुषांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा महासंग्राम भारताने जिंकल्यानंतर आता शनिवारी मुंबईत महिलांमध्ये महामुकाबला रंगणार आहे. वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) म्हणजेच महिलांच्या आयपीएलमधील तिसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा दिल्लीचा संघ प्रथमच बाजी मारणार की मुंबई दुसऱ्या जेतेपदाला गवसणी घालणार, हे पाहणे रंजक ठरेल.

पुरुषांची आयपीएल २००८मध्ये सुरू झाल्यानंतर महिलांच्या आयपीएलसाठी २०२३ पर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागली होती. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेद्वारे भारतीय महिला क्रिकेटला असंख्य प्रतिभावान खेळाडू गवसले आहेत. श्रेयांका पाटील, साइका इशाक, सजीवन सजना ही यांपैकीच काही नावे. यापूर्वी चार वेळा महिलांची चॅलेंजर स्वरूपाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र २०२३मध्ये भारताने प्रथमच १९ वर्षांखालील महिलांचा टी-२० विश्वचषक उंचावला. त्यामुळे महिलांच्या आयपीएलला प्रेरणा मिळाली. आता २०२५च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतातच रंगणार आहे. त्यामुळे डब्ल्यूपीएलमधील कामगिरी त्या संघातील खेळाडूंच्या निवडीच्या दृष्टीने निर्णायक ठरेल.

२०२३पासून आयोजित करण्यात येणाऱ्या डब्ल्यूपीएलमध्ये यंदाही पाच संघ सहभागी झाले. मात्र अपेक्षेप्रमाणे मुंबई आणि दिल्ली या दोन सर्वोत्तम संघांनीच पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. २०२३च्या डब्ल्यूपीएलमध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवरच झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीला धूळ चारली होती. त्यामुळे यंदा लॅनिंगच्या वाघिणी मुंबईवर पलटवार करण्यास आतुर असतील. मुख्य म्हणजे या हंगामातील दोन्ही साखळी लढतींमध्ये दिल्लीने मुंबईवर वर्चस्व गाजवले होते.

सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या दिल्लीला २०२३मध्ये मुंबई, तर २०२४मध्ये बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यावेळी ते पहिल्या जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही. दुसरीकडे २०२३मध्ये जेतेपद मिळवल्यानंतर २०२४मध्ये मुंबईला एलिमिनेटरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा मात्र मुंबईने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे ते या हंगामातील दिल्लीविरुद्धच्या दोन पराभवांचा वचपा घेण्यासही उत्सुक असतील.

एकीकडे दिल्लीने अग्रस्थानासह अंतिम फेरीत स्थान पक्के केले. तर दुसरीकडे साखळी फेरीअखेरीस दुसरे स्थान मिळवणाऱ्या मुंबईने यावेळी एलिमिनेटरमध्ये गुजरातला नमवले. बंगळुरू व यूपी संघांचे आव्हान आधीच संपुष्टात आले होते. मात्र मुंबईच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे गेल्या ५ दिवसांत ते ब्रेबॉर्नवर तीन सामने खेळले आहेत. तसेच येथे तिन्ही लढतींमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघच जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेक निर्णायक ठरू शकते.

दुसरीकडे दिल्ली मात्र गेल्या आठवडाभरात एकही लढत खेळलेली नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात याचा त्यांना फटका बसणार की मिळालेल्या पुरेशा विश्रांतीचा लाभ उचलून दिल्लीचा संघ कमाल करणार, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

ब्रंट, मॅथ्यूजवर मुंबईची मदार

मुंबईचा संघ सामना जिंकणार की नाही, हे प्रामुख्याने दोन खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीवर अवलंबून असते आणि त्या म्हणजे नॅट शीव्हर ब्रंट व हिली मॅथ्यूज. इंग्लंडच्या ब्रंटने तिसऱ्या स्थानी फलंदाजी करताना ऑरेंज कॅपवर कब्जा केलेला आहे. ९ सामन्यांत ५ अर्धशतकांसह तिने ४९३ धावा केल्या आहेत. तसेच वेस्ट इंडिजच्या मॅथ्यूजने मुंबईसाठी ३०४ धावा केल्या आहेत. या दोघींनीही एलिमिनेटरमध्ये अर्धशतके झळकावली. पर्पल कॅप म्हणजेच स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत मुंबईची मॅथ्यूजच १७ बळींसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर मुंबईच्याच लेगस्पिनर अमेलिया करचा (१६) क्रमांक आहे. शिवाय मधल्या फळीत हरमनप्रीत, अमनजोत कौर आहेतच. गोलंदाजीत शबनिम इस्माइल मुंबईसाठी निर्णायक भूमिका बजावेल.

आघाडीची फळी दिल्लीची ताकद

दिल्लीची मुख्य ताकद हे त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज आहेत. युवा शफाली वर्मा, लॅनिंग व जेस जोनासन यांच्यावरच प्रामुख्याने दिल्लीची फलंदाजी अवलंबून आहे. शफालीने ८ सामन्यांत ३००, तर लॅनिंगने २६३ धावा केल्या आहेत. जोनासनने गोलंदाजीतही ११ बळी मिळवले आहेत. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जला फलंदाजीत यावर्षी अपेक्षित योगदान देता आलेले नाही. अनुभवी शिखा पांडेने दिल्लीसाठी या हंगामात सर्वाधिक १२ गडी बाद केले आहेत. तिला श्री चरणी, राधा यादव या फिरकीपटूंची साथ लाभणे आवश्यक आहे. मॅरीझेन काप व ॲनाबेल सदरलँड हे विदेशी खेळाडू दिल्लीसाठी सातत्याने छाप पाडत आहेत. त्यामुळे दिल्लीचा संघही मुंबईच्या तोडीसतोड आहे.

दिल्लीने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. मात्र त्यांना यापूर्वी दोन्ही वेळेस उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे मुंबईने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला असून ते २०२३नंतर पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यास आतुर आहेत. त्यामुळे अंतिम लढत चुरशीची होईल.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स (संभाव्य ११) : हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, हिली मॅथ्यूज, नॅट शीव्हर ब्रंट, अमेलिया कर, अमनजोत कौर, गुनालन कमलिनी, जिंतामणी कलिता, सजीवन सजना, पारुणिका सिसोदिया, शबनिम इस्माईल.

दिल्ली कॅपिटल्स (संभाव्य ११) : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, जेस जोनासन, एलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, मॅरीझेन काप, श्री चरणी, राधा यादव, शिखा पांडे, तिथास साधू.

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in