बजरंगने पद्मश्री परत केला: कुस्तीपटू धास्तीत; मोदींना लिहिले पत्र

बजरंग पुनियाने आपल्या एक्स हँडलवर पंतप्रधानांना लिहिलेले पत्र शेअर करत याबाबतची माहिती दिली. काल ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडल्याचा निर्णय घेतल्यानंतर आज बजरंगने पुरस्कार परत केला. यामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
बजरंगने पद्मश्री परत केला: कुस्तीपटू धास्तीत; मोदींना लिहिले पत्र

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहुन आपण पुरस्कार परत करत असल्याचे सांगितले. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने बजरंग पुनियाने हा निर्णय घेतला. त्याने आपल्या एक्स हँडलवर पंतप्रधानांना लिहिलेले पत्र शेअर करत याबाबतची माहिती दिली. काल ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडल्याचा निर्णय घेतल्यानंतर आज बजरंगने पुरस्कार परत केला. यामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहिलेल्या पत्रात बजरंग पुनियाने २१ डिसेंबर रोजी झालेल्या कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत ब्रिजभूषणचा दबदबा असल्याचे म्हटले आहे. संजय सिंह WFI चे अध्यक्ष झाल्यानंतर ब्रिजभूषणने 'दबदबा आहे आणि दबदबा राहणार' असे वक्तव्य केले असल्याचे पुनिया म्हणाला. महिला कुस्तपटूंनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलेला व्यक्ती कुस्ती महासंघावर दबदबा असल्याचा दावा करत आहे. यामुळे मानसिक दबावात येऊन ऑलिम्पिक पदक विजेती पैलवान साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतल्याचे तो म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, "सरकारने, लोकांनी एवढा मान सन्मान दिला. याच मानसन्माच्या ओझ्याखाली दबून गुदमरत राहू? 2019 साली मला पद्मश्री पुरस्कारने गौरवण्यात आले. खेलरत्न तसेच अर्जुन पुरस्कार देखील मिळाला. हे पुरस्कार मिळाले तेव्हा मी खूश झालो. पण, आज त्यापेक्षा जास्त दु:खी आहे. हा गौरव मला जखडत आहे. याचे कारण फक्त एक आहे, ज्या कुस्तीने हा सन्मान दिला. त्याच आमच्या सहकारी महिला कुस्तीपटूंना आपल्या सुरक्षेसाठी कुस्ती सोडावी लागत आहे." महिला कुस्तीपटूंना अपमानित केल्यानंतर सन्मानित बनून मी आपले जीवन नाही जगू शकत, असे जीवन मला मरेपर्यंत जखडेल, यासाठी हा सन्मान मी परत करत आहे, असेही त्याने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

साक्षीचाही कुस्तीला रामराम

आम्ही महिला अध्यक्षाची मागणी केली होती. महिला अध्यक्ष असल्यास छळ होणार नाही. मात्र, कुस्ती महासंघात या आधीही महिलांचा सहभाग नव्हता आणि आजची यादी बघितली तर एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. आम्ही पूर्ण ताकदीने लढलो, हा लढा अजूनही सुरुच राहणार आहे. नव्या पिढीच्या पैलवानांना लढायचे आहे, असे म्हणत साक्षीने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पत्रकार परिषद सुरु असताना साक्षी मलिकला रडू कोसळले आणि ती पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेली.

आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो होतो. देशातील कानाकोपऱ्यातील लोक आम्हाला पाठिंबा द्यायला येत होते. जर ब्रिजभूषण सिंह यांचे बिझनेस पार्टनर आणि जवळचे सहकारीच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होत असतील तर मी कुस्ती सोडते, असेही साक्षी यावेळी म्हणाली.

दररम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटू यांनी आंदोलन छेडले होते. यामुळे ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर ११ महिन्यांनी झालेल्या WFI च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांचे जवळचे सहकारी आणि व्यावसायिक भागीदार संजय सिंह निवडणून आल्याने कुस्तीपटूंनी हा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in