.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पॅरिस : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला महिलांच्या ५० किलो वजनी गटात १०० ग्रॅम अधिक वजन आढळून आल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र तिला संयुक्त सुवर्णपदक द्यायचे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी क्रीडा लवादाच्या अस्थायी समितीने आणखी एका दिवसाचा वेळ मागितला आहे. त्यामुळे विनेशच्या पदकाचा फैसला रविवारी होणार आहे.
२९ वर्षीय विनेशने मंगळवारी तीन लढतीत विजय मिळवून अंतिम फेरीत मजल मारली होती. मात्र बुधवारी वजन तपासणीवेळी तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त आढळून आल्यामुळे तिला स्पर्धेच्या नियमाप्रमाणे अपात्र ठरवण्यात आले. याप्रकरणी तिने लगेचच क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. क्रीडा लवाद याप्रकरणी शनिवारी संध्याकाळी फैसला सुनावणार होते.
"क्रीडा लवादाच्या अस्थायी समितीने ११ ऑगस्टच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंतचा वेळ घेतला आहे. विनेश वि. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जागतिक कुस्ती संघटनेविरुद्धच्या लढ्याबाबतचा निर्णय एकमेव लवाद डॉ. ॲॅनाबेल बेनेट या निकाल सुनावणार आहेत", असे भारतीय ऑलिम्पिक समितीकडून सांगण्यात आले. हा निकाल सुनावल्यानंतर निकालाची प्रत एका दिवसानंतर जारी करण्यात येईल. आयओएच्या सूत्रांच्या मते, हा निकाल १३ ऑगस्ट रोजी म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोपाच्या दोन दिवसानंतर लागण्याची शक्यता आहे.