कुस्तीपटूंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, भारतीय कुस्ती महासंघाने बंदी हटवण्यासाठी गैरमार्ग वापरल्याचा आरोप

बजरंग पुनिया, साक्षी मलिक या भारताच्या तारांकित आजी-माजी कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कुस्तीपटूंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, भारतीय कुस्ती महासंघाने बंदी हटवण्यासाठी गैरमार्ग वापरल्याचा आरोप

नवी दिल्ली : बजरंग पुनिया, साक्षी मलिक या भारताच्या तारांकित आजी-माजी कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) त्यांच्यावरील बंदी उठवण्यासाठी जागतिक कुस्ती महासंघाची (यूडब्ल्यूडब्ल्यू) दिशाभूल केली तसेच गैरमार्गाचा वापर केला, असा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे.

गेल्या वर्षभरापासून भारतीय कुस्ती महासंघ विविध कारणांनी चर्चेत आहे. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली साक्षी, बजरंग, विनेश फोगट यांच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी सातत्याने आंदोलने केली. बृजभूषण यांना अटक व्हावी तसेच शासनाकडून न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आपापली पदके व प्रतिष्ठेचे पुरस्कारही परत केले. त्याशिवाय साक्षीने कुस्तीतून निवृत्ती पत्करली.

यादरम्यान वाढता शासकीय हस्तक्षेप तसेच वेळेत निवडणूक न घेतल्याचे कारण देत जागतिक महासंघाने ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घातली होती. अखेर १३ फेब्रुवारी रोजी ही बंदी काढण्यात आली. मात्र ही बंदी उठवतानाच जागतिक महासंघाने भारतीय महासंघाकडून कुस्तीपटूंशी कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही, असे लिखित स्वरूपात मागितले आहे. बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हे महासंघ बरखास्त करून हंगामी समितीची स्थापना केली होती.

“संजय सिंह यांनी चुकीच्या पद्धतीने जागतिक महासंघाकडून भारतीय महासंघावरील बंदी हटवून घेतली आहे. त्यांनी खोटी आश्वासने तसेच पैशांच्या बळावर ही बंदी उठवली आहे, असे आम्हाला समजले. शासनाने नेमलेल्या हंगामी समितीने नुकताच उत्तमरित्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले. मात्र बृजभूषण यांची माणसे या स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित असलेल्यांना धमकावत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जर संजय सिंह यांच्याकडेच कुस्ती महासंघाची सूत्रे सोपवण्यात आली, तर आमच्याकडे आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही,” असे साक्षी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हणाली. दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणाविषयी शासन कोणती भूमिका घेईल, हे लवकरच स्पष्ट करू, असे सांगितले.

बृजभूषण यांचा मुलगा उत्तर प्रदेशच्या अध्यक्षपदी

२ ते ३ दिवसांपूर्वीच बृजभूषण यांचा मुलगा करण हा उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. “बृजभूषण यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कुस्तीशी निगडीत पद मिळवण्यास मनाई होती. असे असतानाही बृजभूषण यांचा मुलगा उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून येणे, हे खरंच धक्कादायक आहे. त्यामुळे भारताच्या युवा कुस्तीपटूंच्या कारकीर्दीचा विचार करून याकडे लक्ष द्यावे,” असे बजरंग म्हणाला.

मी कुस्तीतून निवृत्ती पत्करली असली तरी बृजभूषण सारख्या माणसांना माझ्या बहिणींवर अन्याय करू देणार नाही. पुढील २ ते ४ दिवस आम्ही क्रीडा मंत्रालय तसेच शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार आहोत. बृजभूषण, संजय सिंह यांना महासंघातून पूर्णपणे बरखास्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

- साक्षी मलिक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in