
नवी दिल्ली : २०२६मध्ये स्कॉटलंडच्या ग्लास्गो शहरात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन आणि नेमबाजी यांसह एकूण १० क्रीडाप्रकारांना हद्दपार करण्यात आले आहे. स्पर्धेचे आयोजन किफायतशीर दरात आणि विनाअडचणीचे व्हावे, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे आयोजकांनी सांगितले.
यापूर्वी २०१४मध्ये ग्लास्गो येथे राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. त्यानंतर २०१८मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुलचे आयोजन करण्यात आले. २०२२मध्ये बर्मिंगहॅमला राष्ट्रकुल पार पडले. २०२६च्या राष्ट्रकुल आयोजनाचा मान ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहराला मिळाला होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे व्हिक्टोरियाने या स्पर्धेचे आयोजन करण्यास नकार दिला. त्यामुळे आता ग्लास्गोने आयोजनासाठी तयारी दर्शवली. राष्ट्रकुल महासंघाने त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारताना मंगळवारी अधिकृतपणे घोषणा केली.
तसेच दर ८ ते १२ वर्षांनी काही जुने खेळ बाजूला सारतात नवीन खेळांचा स्पर्धेत समावेश केला जातो. त्या खेळांना चांगला प्रतिसाद न लाभल्यास पुन्हा जुने खेळ स्पर्धेत समाविष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळेच यावेळी या खेळांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी ॲथलेटिक्स व पॅरा ॲथलेटिक्स, जलतरण व पॅरा जलतरण, जिम्नॅस्टिक्स, सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो, ३ बाय ३ बास्केटबॉल, ३ बाय ३ व्हिलचेअर बास्केटबॉल या खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
“स्पर्धा ठरावीक बजेटमध्ये पार पडावी, या कारणास्तव १० खेळांना यंदा राष्ट्रकुलमधून वगळण्यात आले आहे. त्यामध्ये हॉकी, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, क्रिकेट, टेबल टेनिस, स्क्वॉश, ट्रायथलॉन यांसारख्या खेळांचा समावेश आहे,” असे राष्ट्रकुल महासंघाने स्पष्ट केले. २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान राष्ट्रकुलचा २३वा हंगाम रंगणार आहे. १२ वर्षांनी पुन्हा ग्लास्गो येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. मात्र प्रमुख खेळांना वगळण्यात आल्याने भारतासह असंख्य देशांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय क्रीडा मंत्रालय याविषयी काय निर्णय घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
भारताला फटका काय?
भारताने गेल्या काही वर्षांत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या खेळांत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला आता असंख्य पदकांना मुकावे लागू शकते. भारताने राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीत ६३ सुवर्णांसह १६५ पदके जिंकली आहेत. तसेच कुस्तीत ११४, हॉकीत ५, बॅडमिंटनमध्ये ३१ पदके पटकावली आहेत. २०२२मध्ये क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश झालेला. त्यावेळी महिला संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारून उपविजेतेपद मिळवत रौप्यपदक जिंकले. मात्र आता हे खेळ नसल्याने भारताचे नुकसान होणार आहे.
भारतीय क्रीडापटूंकडून निषेध
बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, हॉकी यांसारख्या भारताच्या पदकांच्या दावेदार असलेल्या खेळाडूंनाच राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळल्यामुळे देशातील क्रीडापटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी या स्पर्धेसाठी भारताने खेळाडूच पाठवू नयेत, असे सांगितले आहे.
“हॉकी क्रीडा प्रकाराला राष्ट्रकुलमधून वगळण्यात आले, हे अतिशय निराशाजनक आहे. हॉकीसह विविध क्रीडा प्रकारांना हा जबर धक्का आहे,” असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत म्हणाला. त्याशिवाय हॉकी महासंघ व जागतिक हॉकी महासंघानेसुद्धा या निर्णयावर कडाडूट टीका केली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने हा मुद्दा उचलून धरावा आणि याविरोधात न्यायालयात दाद मागावी, अशी मागणीही काही खेळाडूंनी केली आहे.
पुलेला गोपिचंद आणि विमल कुमार या भारताच्या माजी बॅडमिंटनपटू तसेच प्रशिक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. “गेल्या काही वर्षांत बॅडमिंटनने राष्ट्रकुलसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे आता बॅडमिंटन राष्ट्रकुलमध्ये नसेल, यावर विश्वास बसत नाही. माझ्या मते भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागीच होऊ नये,” असे विमल कुमार म्हणाले. “हा निर्णय फारच क्लेशकारक आहे. आपण आपले खेळाडू राष्ट्रकुलसाठी पाठवायला नकोत. केंद्रीय क्रीडा मंत्रालय तसेच शासनाने यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. १० खेळांना वगळण्यात आल्याचा सर्वाधिक फटका भारतालाच बसणार आहे, असे गोपिचंद म्हणाले.
गेल्या ५ राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची कामगिरी
२००६ (मेलबर्न) : २२ सुवर्ण, १७ रौप्य, ११ कांस्य (एकूण ५० पदके)
२०१० (नवी दिल्ली) : ३८ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य (एकूण १०१ पदके)
२०१४ (ग्लास्गो) : १५ सुवर्ण, ३० रौप्य, १९ कांस्य (एकूण ६४ पदके)
२०१८ (गोल्ड कोस्ट) : २६ सुवर्ण, २० रौप्य, २० कांस्य (६६ पदके)
२०२२ (बर्मिंगहॅम) : २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य (६१ पदके)