पॅरिस : ‘आता यापुढे लढण्याची सर्व शक्ती संपली आहे. शेवटी ‘कुस्ती’ जिंकली, मी हरले. आई मला माफ कर. तुझे स्वप्न, माझे धाडस, हिंमत सर्व काही चक्काचूर झाले आहे. यापुढे कोणत्याही संकटाशी दोन हात करण्याचे बळ माझ्यात उरले नाही’, असा संदेश आईला पाठवत कुस्तीपटू विनेश फोगटने अखेर साश्रूनयनांनी आंतरराष्ट्रीय कुस्तीला अलविदा केला.
५० किलो वजनी गटाच्या महिला एकेरीत अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर फायनलआधीच १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला संपूर्ण स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. सुवर्णपदकाची अपेक्षा असताना ‘तेलही गेले आणि...’, अशी धक्कादायक मानसिक स्थिती विनेशची झाली आहे. ‘गुडबाय कुस्ती २००१ ते २०२४. मी तुमच्या सर्वांची ऋणी कायम राहीन. कृपया मला माफ करा,” असे सांगत विनेशने निवृत्तीचा निर्णय जाहीर करत चाहत्यांच्या दु:खात आणखी भर टाकली. अंतिम फेरीत पोहोचूनही अपात्र ठरवण्यात आल्याने विनेशने क्रीडा लवादाकडे दाद मागितली असून संयुक्त रौप्यपदकाने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र विनेशने निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती अनेक आजी-माजी खेळाडूंनी केली आहे.
“विनेश तू हरली नाहीस, तुला हरवण्यात आले आहे. आमच्यासाठी तूच खरी विनर आहेस. देशाची मुलगी म्हणून आम्हाला कायम तुझा अभिमान असेल,” अशा शब्दांत टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने नाराजी व्यक्त केली आहे. “विनेशसोबत जे काही घडले, ते म्हणजे देशातील प्रत्येक मुलीचा पराभव आहे. हा तुझा नव्हे तर संपूर्ण देशाचा पराभव आहे. संपूर्ण देश तुझ्या पाठीशी आहे. एक खेळाडू या नात्याने, तुझा संघर्ष, कठोर मेहनत आणि लढून काहीतरी मिळवण्याची जिद्द याला सलाम,” असे महिलांमधील पहिली ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले.
विनेशची ऑलिम्पिक कारकीर्द
२०१६ रिओ : उपांत्यपूर्व फेरीत गंभीर दुखापतीसह पराभूत
२०२० टोकियो : उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
२०२४ पॅरिस : अंतिम फेरीत पोहोचूनही अपात्र
विनेशला रौप्यपदक मिळणार?
क्रीडा लवादाने अपील स्वीकारले; निर्णय आज सकाळी
पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजनी गटातून १०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर तिने आता क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. क्रीडा लवादानेही विनेशचे अपील स्वीकारले असून यावर पॅरिसच्या प्रमाणवेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी म्हणजेच भारतात शुक्रवारी पहाटे निकाल लागण्याची शक्यता आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आल्यानंतर विनेशने बुधवारीच क्रीडा लवादाकडे धाव घेत फायनलचा सामना थांबवावा, अशी मागणी केली होती. मात्र क्रीडा लवादाने तसे करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर विनेशने आपल्याला संयुक्त रौप्यपदकाने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर क्रीडा लवादाने विनेशची मागणी मान्य केली आहे. येत्या २४ ते ४८ तासांत निकाल येण्याची शक्यता आहे. क्रीडा लवादाने विनेशच्या बाजूने निकाल दिला तर तिला रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे.