जगज्जेतेपदासाठी आजपासून कसोटी; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर बुधवारपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) महाअंतिम मुकाबला रंगणार आहे. एकीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असेल, तर टेम्बा बाव्हुमाच्या नेतृत्वात स्वप्नवत वाटचाल करणारा दक्षिण आफ्रिका संघ चोकर्सचा शिक्का पुसून कसोटीतील अजिंक्यपद काबिज करण्यास आतुर आहे.
जगज्जेतेपदासाठी आजपासून कसोटी; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने
Published on

लंडन : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर बुधवारपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) महाअंतिम मुकाबला रंगणार आहे. एकीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असेल, तर टेम्बा बाव्हुमाच्या नेतृत्वात स्वप्नवत वाटचाल करणारा दक्षिण आफ्रिका संघ चोकर्सचा शिक्का पुसून कसोटीतील अजिंक्यपद काबिज करण्यास आतुर आहे. त्यामुळे उभय संघांतील या द्वंद्वात कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

आयसीसी २०१९पासून कसोटीमध्येही जागतिक पातळीवरील स्पर्धा सुरू केली. त्यापूर्वी वर्षाच्या अखेरीस जो संघ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असायचा, त्याला मानाची गदा (टेस्ट मेस) देण्यात यायची. मात्र २०१९पासून कसोटीतील जगज्जेतेपदासाठी सुरू केलेल्या या संग्रामास चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही स्पर्धा खेळवण्यात येते. यामध्ये प्रत्येक संघ घरच्या मैदानात ३, तर परदेशात ३ कसोटी मालिका खेळतो. साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानी असलेले संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. २०१९-२०२१ या कालावधीत भारत-न्यूझीलंड संघाने अंतिम फेरी गाठली होती. न्यूझीलंडने भारताला अंतिम फेरीत धूळ चारून पहिला जागतिक कसोटी विजेता ठरण्याचा मान मिळवला. त्यानंतर २०२१-२०२३ या कालावधीतही भारताने अंतिम फेरी धडक मारली. मात्र यावेळीही त्यांच्या पदरी निराशा पडली, कारण ऑस्ट्रेलियाने त्यांना अंतिम सामन्यात नेस्तनाबूत केले. आता २०२३-२५च्या कालावधीत भारतीय संघ न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये पराभूत झाल्याने अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. तर आफ्रिकेने यंदा प्रथमच डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी पाकिस्तान, श्रीलंका या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी करून आगेकूच केली. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियानेच आफ्रिकेला उपांत्य फेरीत नमवले होते. त्यामुळे आता आफ्रिका त्यांना धक्का देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज पाहता येथे सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना सहाय्य मिळू शकते. त्यामुळे फलंदाजांचा कस लागू शकतो. गेला आठवडाभर लॉर्ड्सच्या आजबाजूच्या भागात पाऊस पडलेला नसला तरी, सामन्यातील काही दिवस पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्समध्ये ४० पैकी १८ कसोटी जिंकल्या आहेत, तर सात लढती गमावल्या आहेत. आफ्रिकेने लॉर्ड्स येथे १८ पैकी ६ कसोटी जिंकल्या असून ८ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

  • ऑस्ट्रेलिया (अंतिम ११) : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लबूशेन, कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लायन.

  • दक्षिण आफ्रिका (अंतिम ११) : टेम्बा बाव्हुमा (कर्णधार), एडीन मार्करम, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, कायले वेरान, वियान मल्डर, मार्को यान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.

स्मिथ आणि वेगवान त्रिकुटावर नजरा

ऑस्ट्रेलियाने या लढतीसाठी मार्नस लबूशेनला सलामीला पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॅमेरून ग्रीन तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या अनुभवी खेळाडूंवर कांगारूंच्या फलंदाजीची भिस्त असेल. तसेच उस्मान ख्वाजाही व यष्टिरक्षक कॅरीही त्यांच्यासाठी प्रभावी ठरू शकतात. मुख्य लक्ष हे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान त्रिकुटावर असेल. कमिन्स, मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांना सामोरे जाणे आफ्रिकेसाठी सोपे नसेल. तसेच फिरकीपटू नॅथन लायनही या खेळपट्टीवर छाप पाडू शकतो.

रबाडा, यान्सेन, बाव्हुमावर भिस्त

दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू कगिसो रबाडा या लढतीत कशाप्रकारे वेगवान मारा करतो, यावर संघाचे भवितव्य अवलंबून असेल. त्याला मार्को यान्सेन, लुंगी एन्गिडी या वेगवान जोडीसह फिरकीत केशव महाराजची साथ लाभेल. आफ्रिकेला मुख्य चिंता फलंदाजीची असेल. कारण बाव्हुमाव्यतिरिक्त त्यांच्याकडे फारसा अनुभवी फलंदाज नाही. मात्र रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स व एडीन मार्करम या त्रिकुटाने गेल्या वर्षभरात कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा आहे.

तुम्हाला हे माहीत आहे का?

  • हेझलवूड संघाचा भाग असताना ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्सवर एकही कसोटी गमावलेली नाही.

  • हेझलवूड, कमिन्स आणि स्टार्क संघात असताना ऑस्ट्रेलियाने आजवर एकाही आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावलेला नाही. या तिघांनी एकदिवसीय विश्वचषक २०१५, २०२३, टी-२० विश्वचषक २०२१ व जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२३) अशा आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने एकत्रित जिंकलेले आहेत.

  • बाव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेने अद्याप एकही कसोटी गमावलेली नाही. बाव्हुमाने ९ पैकी ८ कसोटींमध्ये संघाचे यशस्वी नेतृत्व केले, तर १ लढत अनिर्णित राहिली आहे.

  • २०२५ या वर्षात अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये नवा विजेता उदयास आला आहे. त्यामुळे आफ्रिका ही परंपरा कायम राखणार का, याकडे लक्ष असेल.

५४-२६

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १०१ कसोटी सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने ५४, तर आफ्रिकेने २६ लढती जिंकल्या आहेत. २१ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. आकडेवारीनुसार कांगारूंचे पारडे जड असून आफ्रिका पलटवार करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

  • वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in