भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदासाठी झावीचा अर्ज, पण...

स्पेनचा दिग्गज फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक झावी हर्नांडेझने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आली आहे.
भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदासाठी झावीचा अर्ज, पण...
Photo : X
Published on

नवी दिल्ली : स्पेनचा दिग्गज फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक झावी हर्नांडेझने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आली आहे. मात्र अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) झावीचा अर्ज फेटाळून लावला आहे. झावीने मागितलेले वार्षिक मानधन आवाक्यापलीकडे असल्याने आपल्या महासंघाने त्यास नकार दिला आहे, असे समजते.

४५ वर्षीय झावी हा गेल्या वर्षापर्यंत स्पेनमधील तारांकित फुटबॉल क्लब बार्सिलोनाचा प्रशिक्षक होता. खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पेनचे, तर क्लबस्तरीय स्पर्धांमध्ये झावीने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१०च्या विश्वचषक विजेत्या व २००८, २०१२च्या युरो चषक विजेत्या स्पेन संघाचा झावी मोलाचा भाग होता.

त्याशिवाय तब्बल २४ वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर झावीने अल साद या संघाचे काही काळासाठी प्रशिक्षकपद भूषवले. मग २०२३मध्ये बार्सिलोनाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर त्याने संघाला ला लिगा जिंकवून देण्यात मार्गदर्शन केले. मात्र बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग जिंकता आली नाही. परिणामी झावीने जून २०२४मध्ये बार्सिलोनाचे प्रशिक्षकपद सोडले. तेव्हापासून तो योग्य संधीच्या प्रतीक्षेत आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना जुलै महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा देण्यात भाग पाडण्यात आले. त्यानंतर एआयएफएफने अर्जांसाठी मागणी केली होती. त्यामध्ये झावीसह भारताचे यापूर्वीचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन, स्लोव्हाकियाचे स्टीफन तार्कोव्हिच व भारताचे खलिद जमिल यांचे अर्ज आढळले.

“होय. झावीने भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. बार्सिलोना संघाचा प्रशिक्षक असताना त्याला ८० कोटी वार्षिक मानधन होते. त्याने आता ८५ कोटींची मागणी केली होती. इतके मानधन देणे शक्य नसल्याने त्याच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही,” असे एआयएफएफच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

मोदींची प्रीमियर लीगविषयी चर्चा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी प्रीमियर लीगचे भारतात कशी क्रेझ आहे. तसेच भारतीय चाहते प्रीमियर लीगचे सामने आवर्जून पाहतात, याविषयी स्टार्मर यांना माहिती दिली. त्यामुळे भविष्यात प्रीमियर लीगमधील काही खेळाडू भारताच्या सुपर लीगमध्ये खेळायला येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मात्र दुसरीकडे आर्थिक क्षमता नसल्याने एआयएफएफने झावीचा प्रशिक्षकपदाचा अर्ज फेटाळला. त्यामुळे समाज माध्यमांवर याविषयी चर्चा सुरू असून अनेक जण भारतीय फुटबॉलवर टीकाही करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in