वेटलिफ्टिंगमध्ये पंजाबच्या 'या' महिला खेळाडूने जिंकले कांस्यपदक

तिच्या विजयानंतर केवळ गावातच नाही, तर पंजाबसह संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला.
 वेटलिफ्टिंगमध्ये पंजाबच्या 'या' महिला खेळाडूने जिंकले कांस्यपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौरने स्नॅचमध्ये ९३ किलो आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये ११९ किलो वजन उचलले. तिने एकूण २१२ किलो वजन उचलत तिसरे स्थान मिळविले.

पंजाबमधील नाभा येथील मेहस गावची हरजिंदर कौर स्वतः जनावरांसाठी चारा कापण्यासाठी मशीन चालवत असते. तिच्या विजयानंतर केवळ गावातच नाही, तर पंजाबसह संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला.

हरजिंदरचे कुटुंब मेहसमध्ये एका खोलीच्या घरात राहते. त्यांच्याकडे सहा म्हशी आहेत. हे कुटुंब करारावर शेतात काम करते. वडील साहिब सिंग आणि आई कुलदीप यांची हरजिंदर ही सर्वात लहान मुलगी आहे.

हरजिंदर नाभा येथे सरकारी कन्या विद्यालयात असताना कबड्डी खेळण्यासाठी पाच किलोमीटरपर्यंत सायकल चालवित असे. यानंतर ती आनंदपूर साहिब येथील महाविद्यालयात शिकण्यासाठी गेली. वडील हरजिंदरला कॉलेजच्या वसतिगृहात राहण्यासाठी ३५० रुपये भाडे आणि ३५० रुपये पॉकेटमनी देत ​​असत.

हरजिंदरने कबड्डीपासून आपल्या क्रीडा जीवनाची सुरुवात केली. कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर तेथील कॉलेजच्या कबड्डी संघात तिचा समावेश झाला. एका वर्षानंतर हरजिंदर पंजाबी विद्यापीठ, पटियालाच्या क्रीडा शाखेत सामील झाली. प्रशिक्षक परमजीत शर्मा यांनी हरजिंदरची प्रतिभा ओळखून तिला रस्सीखेच टीममध्ये समाविष्ट करण्यात आले.

हरजिंदरसाठी कुटुंबाने बँकेकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हरजिंदरचा भाऊ प्रीतपाल यानेही मदत केली. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू झाला, तेव्हा हरजिंदरने स्वतःचा बारबेल सेट नसल्याने प्रशिक्षक परमजीत शर्मा यांच्या घरी सराव केला. हरजिंदर २०१७मध्ये राज्य वेटलिफ्टिंग चॅम्पियन बनली. त्यानंतर ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन, सीनियर नॅशनलमध्ये रौप्यपदक विजेती ठरली. खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्समध्ये तिने रौप्यपदक मिळविले.

त्याच वर्षी हरजिंदरने ओरिसामध्ये सिनियर नॅशनल ७१ किलो गटात सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर ती राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in