इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताचा सलामीवीर, मुंबईकर यशस्वी जैस्वालने ५७ धावांच्या खेळीदरम्यान कसोटी कारकीर्दीतील १,००० धावांचा टप्पा पूर्ण केला. याबरोबरच त्याने भारताकडून सर्वात कमी कसोटींमध्ये हजार धावा करणारा फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. यशस्वीने महान फलंदाज सुनील गावसकर यांचा विक्रम मोडीत काढला. गावसकर यांनी ११ कसोटींमध्ये १ हजार धावा केल्या होत्या. यशस्वीने मात्र नवव्या कसोटीतच ही कामगिरी केली.
त्याशिवाय डावांचा (इनिंग) विचार करता यशस्वी यशस्वीने या यादीत दुसरे स्थान मिळवले. विनोद कांबळीने १४ डावांत १ हजार धावा फटकावल्या होत्या, तर यशस्वीने यासाठी १६ डाव घेतले. यशस्वीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत ७१२ धावा केल्या आहेत. भारताकडून एखाद्या कसोटी मालिकेत ७००हून अधिक धावा करणारा तो गावसकर यांच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला. गावसकर यांनी १९७१मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७७४ धावा कुटल्या होत्या.
यशस्वीने भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला. कोहलीने २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध ६५५ धावा केल्या होत्या.