"मी आज जे काही आहे ते मुंबईमुळेच", गोव्याकडून खेळण्याचा निर्णय का घेतला? यशस्वीनेच सांगितले कारण

"हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. मी आज जे काही आहे ते मुंबईमुळेच आहे. या शहरानेच मला घडवले आहे आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एमसीएचा ऋणी राहीन,"
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने बुधवारी अनपेक्षितपणे मुंबईला सोडचिठ्ठी देण्याचा आणि आगामी देशांतर्गत हंगामात (२०२५-२६) गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला असला तरी "कायमस्वरूपी मुंबई क्रिकेट आणि या शहराचा ऋणी राहील", असे त्याने म्हटले आहे.

जैस्वालने गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ‘एनओसी’ची (ना हरकत प्रमाणपत्र) विनंती करत ईमेल पाठवला आहे.

"हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. मी आज जे काही आहे ते मुंबईमुळेच आहे. या शहरानेच मला घडवले आहे आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एमसीएचा ऋणी राहीन," असे जैस्वाल 'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना म्हणाला.

कर्णधारपदाची संधी मिळाल्यामुळे घेतला निर्णय

गोव्याकडून मिळालेल्या कर्णधाराच्या भूमिकेबद्दल बोलताना तो म्हणाला, “गोव्याने मला एक नवी संधी आणि नेतृत्वाची भूमिकाही दिली आहे. माझे पहिले लक्ष्य भारतासाठी चांगली कामगिरी करणे हेच असेल आणि जेव्हा मी राष्ट्रीय संघासाठी खेळत नसेन, तेव्हा मी गोव्याकडून खेळेन आणि त्यांना स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीन. ही एक महत्त्वाची संधी होती, ती माझ्याकडे आली आणि मी ती स्वीकारली.”

"मला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आणि असोसिएशनने दिलेल्या संधीमुळे प्रचंड फायदा झाला. मात्र, आपल्या कारकिर्दीच्या आकांक्षा आणि वैयक्तिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार केल्यानंतर संघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे", असेही एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये यशस्वीने नमूद केले आहे.

गोव्याचे कर्णधारपद

यशस्वीला गोव्याच्या रणजी तसेच मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येऊ शकते. मुंबईचा भाग असताना यशस्वीला इतक्या सहज कर्णधारपद मिळणे शक्य नव्हते. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर सध्या मुंबईचे कर्णधार आहेत. त्यामुळेच त्याने गोव्याचा प्रस्ताव स्वीकारला असावा. गोवा असोसिएशनचे सचिव  शंबा देसाई यांनीही यशस्वी हा कर्णधारपदाचा दावेदार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, २३ वर्षांच्या यशस्वीसाठी हा मोठा टप्पा आहे. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाडसारख्या खेळाडूंनीही आपल्या कारकिर्दीत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. यशस्वी उत्तर प्रदेशातील छोट्याशा गावातून वयाच्या ११ व्या वर्षी क्रिकेटचे स्वप्न घेऊन मुंबईत आला होता.

logo
marathi.freepressjournal.in