
मुंबई : भारताचा प्रतिभावान डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अनपेक्षितपणे देशांतर्गत क्रिकेटमधील संघ मुंबईला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील हंगामामध्ये तो गोवा संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसण्याची दाट शक्यता आहे. याच कारणामुळे त्याने मुंबईला अचानक सोडचिठ्ठी दिल्याचे समजते.
२३ वर्षीय यशस्वी हा सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये (रणजी, विजय हजारे, मुश्ताक अली या स्पर्धांत) यशस्वी गेल्या ६ वर्षांपासून मुंबई संघाचा भाग आहे. यशस्वी हा काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशहून मुंबईत क्रिकेट खेळण्यासाठी आला होता. स्थानिक स्पर्धांमध्ये छाप पाडल्यावर त्याला मुंबईच्या तिन्ही प्रकारच्या संघात स्थान लाभले. २०१९मध्ये यशस्वीने मुंबईकडून पदार्पण केले. त्याने ३६ प्रथम श्रेणी सामन्यांत ६०च्या सरासरीने ३,७१२ धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने मुंबईसाठी ३३ एकदिवसीय व १०७ टी-२० सामने खेळले.
जुलै २०२३मध्ये यशस्वीने भारतीय संघात दमदार पदार्पण केले. सध्या तो भारताच्या कसोटी संघात असून लवकरच टी-२० व एकदिवसीय प्रकारातही त्याचे स्थान पक्के होईल, असे अपेक्षित आहे. दरम्यान, फेब्रुवारीत संपलेल्या रणजी हंगामात यशस्वी मुंबईकडून एकच लढत खेळला. सध्या मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. तसेच यशस्वीला मुंबईचे कर्णधारपद भूषवण्याची इच्छा असल्याचे समजते. तूर्तास ते शक्य नसल्याने तो २०२५-२६ या हंगामात गोव्याकडून खेळणार असल्याचे समजते. यासंबंधी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ‘एनओसी’ची (ना हरकत प्रमाणपत्र) मागणी केली आहे. एमसीएनेसुद्धा यशस्वीची मागणी मान्य केली आहे.
“यशस्वीचा निर्णय धक्कादायक आहे. मात्र त्याने विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. त्याने आमच्याकडे यासाठी परवागनी मागितल्यावर आम्हीही त्यास लगेच होकार दर्शवला,” असे एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शंबा देसाई यांनी याविषयी अधिक माहिती दिली. “यशस्वी हा भारताचा सर्वोत्तम युवा फलंदाज आहे. सध्या आम्ही गोवा संघाची सर्वोत्तम युवा खेळाडूंसह बांधणी करण्यावर भर देत आहोत. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात आम्ही यशस्वीला यासंबंधी विचारणा केली होती. त्याने विनंतीचा मान राखल्याने आम्ही त्याचे संघात स्वागत करतो,” असे देसाई म्हणाले.
तेंडुलकर, लाड यांच्यानंतर यशस्वी तिसरा
सचिन तेंडुलकरचा मुलगा व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर, विख्यात क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा पुत्र सिद्धेश लाड यांनीही यापूर्वी मुंबईला सोडचिठ्ठी देत गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता यशस्वी हा गोव्याकडून खेळणारा तिसरा मुंबईकर ठरले. २०२२-२३च्या हंगामापूर्वी दोघेही गोव्यात दाखल झाले होते. अर्जुन अद्यापही गोवा संघाचा भाग आहे, तर सिद्धेश मात्र मुंबईत पुन्हा परतला आहे. नियमानुसार आपल्या पूर्वीच्या संघात परतल्यावर एक वर्षाचा कुलिंग ऑफ पिरियड पार करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सिद्धेश २०२३-२४च्या हंगामात खेळू शकला नाही. मात्र यंदा तो २०२४-२५ या हंगामात मुंबईकडून खेळला.
गोव्याचा कर्णधार होण्याची शक्यता
यशस्वीला गोव्याच्या रणजी तसेच मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येऊ शकते. भारतीय संघाचा भाग नसल्यास तो गोव्यासाठी उपलब्ध असण्याची दाट शक्यता आहे. मुंबईचा भाग असताना यशस्वीला इतक्या सहज कर्णधारपद मिळणे शक्य नव्हते. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर सध्या मुंबईचे कर्णधार आहेत. त्यामुळेच त्याने गोव्याचा प्रस्ताव स्वीकारला असावा. गोवा असोसिएशनचे सचिव देसाई यांनीही यशस्वी हा कर्णधारपदाचा दावेदार असल्याचे म्हटले.