युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा; भारताच्या अभियानाला आज सुरुवात

आफ्रिकेत यंदा १९ वर्षांखालील विश्वचषक सुरू असून भारताने एकंदर ५ वेळा युवा विश्वचषक उंचावलेला आहे.
युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा; भारताच्या अभियानाला आज सुरुवात

ब्लोमफोंटेन (दक्षिण आफ्रिका) : उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या लढतीने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) अभियानाला प्रारंभ करणार आहे. २०२०मध्ये बांगलादेशनेच भारताला अंतिम फेरीत नमवले होते, तर २०२२मध्ये मात्र भारताने ही स्पर्धा जिंकली होती.

आफ्रिकेत यंदा १९ वर्षांखालील विश्वचषक सुरू असून भारताने एकंदर ५ वेळा युवा विश्वचषक उंचावलेला आहे. यंदा भारताला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत बांगलादेशकडूनच पराभव पत्करावा लागला. मात्र भूतकाळ विसरून नव्या दमाने सुरुवात करण्याची भारताला संधी आहे. अ-गटात समावेश असलेल्या भारताला बांगलादेशनंतर अनुक्रमे आयर्लंड (२५ जानेवारी) व अमेरिका (२८ जानेवारी) यांच्याशी खेळायचे आहे. १६ संघांचा या स्पर्धेत समावेश असून त्यांचा चार गटांत विभागण्यात आले आहे.

६ व ८ फेब्रुवारी रोजी उपांत्य, तर ११ फेब्रुवारीला बेनोनी येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल. बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिका या संघांकडून भारताला स्पर्धेत कडवी चुरस मिळू शकते. भारतीय संघातील महाराष्ट्राचा अर्शीन कुलकर्णी व अरावेली अविनाश यांना आयपीएल लिलावात बोली लावण्यात आल्याने त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. अष्टपैलू मुशीर खान हा एकमेव मुंबईकर भारतीय संघात आहे.

युवा विश्वचषकासाठी भारताचा संघ

उदय सहारन (कर्णधार), सौम्य कुमार पांडे, अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रूद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, मुरुगन अभिषेक, अरावेली अविनाश, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी. राखीव खेळाडू : प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमान.

logo
marathi.freepressjournal.in