'युवा' रोहन बोपण्णाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून केला वर्ल्ड रेकॉर्ड

ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरणारा बोपण्णा हा सर्वाधिक वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
'युवा' रोहन बोपण्णाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून केला वर्ल्ड रेकॉर्ड

मेलबर्न : भारताचा ४३ वर्षीय (युवा) टेनिसपटू रोहन बोपण्णाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान झालेल्या बोपण्णाने ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत दणदणीत विजय मिळवून ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरणारा बोपण्णा हा सर्वाधिक वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.

रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत बोपण्णा व एब्डन यांच्या दुसऱ्या मानांकित जोडीने सिमोन बोलेली आणि आंद्रे वॅवासोरी या इटलीच्या बिगरमानांकित जोडीला ७-६ (७-०), ७-५ असे सरळ दोन सेटमध्ये नेस्तनाबूत केले. १ तास आणि ३९ मिनिटांतच त्यांनी ही लढत जिंकली. ३६ वर्षीय एब्डनने यापूर्वी २०२२मध्ये अन्य सहकाऱ्यासह विम्बल्डनचे पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर तो २०२३पासून बोपण्णासह खेळायला लागला. लवकरच पद्मश्री पुरस्काराद्वारे सन्मानित करणाऱ्या येणाऱ्या बोपण्णाचे मात्र हे पुरुष दुहेरी कारकीर्दीतील पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद होते. तसेच वयाच्या ४३व्या वर्षी बोपण्णा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा भारताचा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. तसेच भारतासाठी पुरुष दुहेरीत एखादे ग्रँडस्लॅम पटकावणारा तो तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी लिएंडर पेस व महेश भूपती यांनी भारताकडून अशी कामगिरी केली होती.

बोपण्णा व एब्डन यांनी पहिल्या गेमपासूनच वर्चस्व गाजवले. मात्र इटलीच्या जोडीनेसुद्धा त्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. तेथे मात्र बोपण्णा-एब्डनने अनुभवाच्या बळावर बाजी मारली. मग दुसऱ्या सेटमध्ये दुसऱ्या मानांकित जोडीने खेळ उंचावला. अखेर बोपण्णानेच दमदार फोरहँडचा टॅप फटका लगावून विजयावर शिक्कामोर्तब केले. जेतेपदानंतर बोपण्णा व एब्डन यांनी केलेला जल्लोष पाहण्याजोगा होता.

बोपण्णाने मनोगत व्यक्त करताना प्रशिक्षक, फिजिओ चाहत्यांसह सर्वांचे आभार मानतानाच स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या पत्नीचे आयुष्यातील मोलाचे योगदानही अधोरेखित केले. सोमवारी जेव्हा टेनिसची नवी क्रमवारी जाहीर करण्यात येईल, तेव्हा बोपण्णा व एब्डन अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असतील. बोपण्णा खेळत असताना ‘जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा’ या घोषणासुद्धा भारतीय चाहत्यांनी दिल्या. एकूणच बोपण्णाच्या या देदीप्यमान यशामुळे भारतातील टेनिसला नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.

बोपण्णासाठी संस्मरणीय आठवडा

२४ जानेवारी : जागतिक पुरुष दुहेरी क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान

२५ जानेवारी : प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारासाठी निवड

२७ जानेवारी : पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

४०

नेदरलँड्सच्या जीन जुलिएन रॉजरने २०२२मध्ये वयाच्या ४०व्या वर्षी मार्सेलो अरेवोलाच्या साथीने फ्रेंच ओपनच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. बोपण्णाने यावेळी रॉजरचा विक्रम मोडीत काढला.

दोन वर्षांपूर्वी मी एका व्हिडीओमध्ये टेनिसमधून निवृत्त होत असल्याचा विचार करत आहे, असे म्हटले होते. त्यानंतर पाच महिन्यांत मला एकही सामना जिंकता आला नाही. या सर्व आव्हानांवर मात करत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवू शकेन, याची कधी कल्पनाही केली नव्हती. वयाच्या ४३व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणे अभिमानास्पद आहे. एब्डनच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. भारतीय टेनिससाठी हे जेतेपद फार मोलाचे आहे.

- रोहन बोपण्णा

बोपण्णाची तंदुरुस्ती आणि चिकाटी पाहून मी थक्क झालो आहे. तो एक योद्धा आहे. आताशी आम्ही पहिलेच ग्रँडस्लॅम जिंकले आहे. भविष्यात आणखी जेतेपदे मिळवू.

- मॅथ्यू एब्डन, बोपण्णाचा सहकारी

असाही योगायोग

२०१७मध्ये बोपण्णाने जेव्हा फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले. त्यावेळेसही त्याचे सासू-सासरे प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. आता ७ वर्षांनी बोपण्णा दुसरे ग्रँडस्लॅम जिंकला, त्यावेळीसही त्यांनी हजेरी लावली. बोपण्णाने याचा उल्लेख करताना तुम्ही माझा प्रत्येक ग्रँडस्लॅम सामना पाहण्यासाठी का येत नाही, असा प्रश्न मजेशीरपणे विचारला. तसेच त्याने संपूर्ण कुटुंबासह कोर्टवर छायाचित्रही काढले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in