IPL 2025 : झहीरचाही पिच क्युरेटरवर निशाणा; पंजाबविरुद्ध लखनऊसाठी फायदेशीर खेळपट्टी तयार न केल्याचा आरोप

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पिच क्युरेटर म्हणजेच खेळपट्टी देखरेखकारांवर निशाणा साधण्याची मालिका कायम आहे.
IPL 2025 : झहीरचाही पिच क्युरेटरवर निशाणा; पंजाबविरुद्ध लखनऊसाठी फायदेशीर खेळपट्टी तयार न केल्याचा आरोप
फोटो : पीटीआय
Published on

लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पिच क्युरेटर म्हणजेच खेळपट्टी देखरेखकारांवर निशाणा साधण्याची मालिका कायम आहे. बुधवारी यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खानची भर पडली. पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत इकाना स्टेडियमची खेळपट्टी ही लखनऊच्या दृष्टीने फायदेशीर नव्हती, असे स्पष्ट मत झहीरने व्यक्त केले. लखनऊ घरचा संघ असूनही पंजाबच्या क्युरेटरने ही खेळपट्टी बनवली असे वाटल्याचेही तो म्हणाला.

आयपीएलचे १८वे पर्व सध्या धडाक्यात सुरू आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानात साखळी फेरीतील १४ पैकी ७ सामने खेळतो. (उदाहरणार्थ मुंबई इंडियन्सचे सात सामने हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होतात, तर अन्य ७ सामने हे प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात होतात.) बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचा कर्णधार किंवा प्रशिक्षकीय फळीतील सदस्याला क्युरेटरला आदेश देण्याची परवानगी नसते. मात्र किमान क्युरेटरने घरच्या संघाला फायदेशीर ठरेल, अशी खेळपट्टी तयार करण्याचे अपेक्षित असते. मात्र गेल्या २ आठवड्यांत तीन संघांनी घरच्या मैदानातील खेळपट्ट्यांबाबत तसेच क्युरेटरविषयी नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे व चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आपापल्या संघाच्या घरच्या मैदानावरील क्युरेटवर निशाणा साधला होता.

मंगळवारी इकाना स्टेडियमवरील लढतीत पंजाबने घरचा संघ म्हणजेच लखनऊला ८ गडी आणि २२ चेंडू राखून सहज धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने २० षटकांत ७ बाद १७१ धावा केल्या. यापूर्वीच्या हंगामात लखनऊमध्ये इतक्या धावा विजयासाठी पुरेशा ठरायच्या. मात्र पंजाबने हे लक्ष्य १७ षटकांच्या आतच गाठले. तसेच पंजाबने ४ वेगवान गोलंदाज व २ फिरकीपटूंचा वापर केला, तर लखनऊने मात्र त्याउलट २ वेगवान व ४ फिरकीपटूंना संधी दिली. लखनऊचा प्रयोग फसल्याने त्यांना दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनऊचा हा घरच्या मैदानातील पहिलाच सामना होता.

पराभवानंतर प्रथम कर्णधार ऋषभ पंतने फिरकीपटूंना पोषक तसेच काहीशी संथ खेळपट्टी आम्हाला अपेक्षित होती, असे मत व्यक्त केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत झहीरने अधिक स्पष्टपणे यावर भाष्य केले. “आयपीएलमध्ये घरच्या मैदानात खेळताना प्रत्येक संघ त्याचा लाभ घेतो. मात्र पंजाबविरुद्ध आम्हाला असे जाणवले नाही. कदाचित क्युरेटरला ही लढत लखनऊच्या दृष्टीने वाटली नसावी. कारण पंजाबच्या क्युरेटरने ही खेळपट्टी तयार केल्याचे जाणवले,” असे ४६ वर्षीय झहीर म्हणाला.

“आम्ही सुमार खेळ केला हे मान्य आहे. पराभवाची कारणे देण्यास मलाही आवडत नाही. मात्र घरचा संघ म्हणून आम्हाला काही सुविधा मिळणे गरजेचे आहे. कदाचित उर्वरित ६ घरच्या सामन्यांत स्थिती बदलेल, असे अपेक्षित आहे. घरच्या मैदानात आम्ही उत्तम खेळ करून जिंकलो, तरच संघाला चाहत्यांचाही अधिक पाठिंबा लाभेल,” असेही झहीरने नमूद केले. तसेच त्याने पंजाबच्या खेळाडूंचेही कौतुक करताना त्यांनी खेळपट्टी योग्यपणे ओळखल्याचे कबुल केले.

एकूणच झहीरच्या वक्तव्यामुळे पिच क्युरेटरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लखनऊच्या क्युरेटरने मात्र याविषयी मत व्यक्त केलेले नाही किंवा त्यांचे नावही समजलेले नाही. लखनऊचा संघ शुक्रवारी घरच्या मैदानातच मुंबईविरुद्ध पुढील लढत खेळणार आहे. त्यामुळे या लढतीत खेळपट्टी कशी असेल, हे पाहणे रंजक ठरेल.

रहाणे, फ्लेमिंग काय म्हणाले होते?

कोलकाताला बंगळुरूविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव झाल्यानंतर कर्णधार रहाणेने खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक पोषक हवी होती, असे मत व्यक्त केले. त्यावर कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मुख्य पिच क्युरेटर सुजन मुखर्जीने खेळाडूंनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे सांगितले. कोलकाताचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही घरच्या संघाला खेळपट्ट्यांचा लाभ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

त्यानंतर चेन्नईला चेपाक येथे बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईचे फिरकीपटू या लढतीत अपयशी ठरले. त्यावेळी संघाचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला घरच्या मैदानातील खेळपट्टी कशी असेल, याचा अंदाजच बांधता येत नसल्याचे सांगितले. आम्ही प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर अधिक सामने जिंकत आहोत, असेही फ्लेमिंग म्हणाले. त्यामुळे सध्या पिच क्युरेटर आणि खेळपट्ट्यांचा मुद्दा चर्चेत आहे.

लाल आणि काळ्या मातीची खेळपट्टी

लाल मातीच्या खेळपट्टीवर धावांचा वर्षाव होतो. येथे चेंडू सहज बॅटवर येतो. वेगवान गोलंदाजांना स्विंग व बाऊन्सही मिळतो. २०० धावांचा पाठलाग करणेही अशा खेळपट्टीवर सोपे जाते.

काळ्या मातीच्या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवतात. ही खेळपट्टी काहीशी संथ असते. येथे टी-२० सामन्यांत १७० ते १८० धावाही विजयासाठी पुरेशा ठरू शकतात. तसेच येथे चेंडू सहजपणे बॅटवर येत नाही. दोन्ही खेळपट्ट्यांवर गरजेनुसार गवताचा थर ठेवता येतो. विदेशातील खेळपट्ट्यांमध्ये मात्र वेगळी पद्धत वापरण्यात येते.

लखनऊच्या दिग्वेशला दंड

पंजाबचा फलंदाज प्रियांश आर्याला बाद केल्यावर लखनऊचा फिरकीपटू दिग्वेश राठीने त्याच्या बाजूला जाऊन टिकमार्क केल्याच्या शैलीत सेलिब्रेशन केले. मात्र यामुळे बीसीसीआयने दिग्वेशला दंड ठोठावत त्याच्या सामन्याच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापली. दिग्वेश व प्रियांश दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एकाच संघातून खेळायचे. त्यामुळेच दिग्वेशने प्रियांशला डिवचल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in