राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत झैद अहमद, आकांक्षा कदम यांना विजेतेपद

अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी झैदने मुंबई उपनगरच्या संदीप दिवेला तर महम्मद घुफ्रानने मुंबईच्या प्रशांत मोरेला नमविले होते
 राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत झैद अहमद, आकांक्षा कदम यांना विजेतेपद

चेंबूर जिमखाना आयोजित पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमदने मुंबईच्या महम्मद घुफ्रानवर २५-१८, २५-१७ अशी सरळ दोन सेटमध्ये अनपेक्षित मात करत विजेतेपद पटकाविले.

अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी झैदने मुंबई उपनगरच्या संदीप दिवेला तर महम्मद घुफ्रानने मुंबईच्या प्रशांत मोरेला नमविले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबई उपनगरच्या संदीप दिवेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १३-२३, १७-१५ व २५-४ असा विजय मिळविला.

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या नीलम घोडकेवर तीन सेट पर्यंत रंगलेल्या लढतीत १९-१४, १५-१९ व २५-० असा विजय मिळून विजेतेपदावर आपले नाव कोरले. आकांक्षाने व नीलमने अंतिम फेरीत मजल मारण्यापूर्वी अनुक्रमे मुंबईच्या संगीता चांदोरकर व ऐशा साजिद खानला हरविले होते. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये संगीताने ऐशाला १२-२५, २४-१४ व २४-१ असे पराभूत केले.

विजेत्यांना चेंबूर जिमखान्याच्या माजी अध्यक्ष एस. के. शर्मा, विद्यमान अध्यक्ष बालकृष्ण वधावन, क्रीडा सचिव पी. एम. बाळकृष्णा, कॅरम व बुद्धिबळ विभाचे सचिव बाळकृष्ण परब, तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार, सचिव यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे सचिव इकबाल नबी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरून एकाच वेळी ५ सामने लाईव्ह दाखविण्याचा विक्रम नोंदविण्यात आला. जिमखान्यातर्फे अध्यक्ष बालकृष्ण वधावन यांनी पुढील वर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in