ठाण्यातील १ लाख ७ हजार ५२० विद्यार्थी यंदा बारावीला

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पाडाव्यात, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
ठाण्यातील १ लाख ७ हजार ५२० विद्यार्थी यंदा बारावीला
Published on

ठाणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला म्हणजेच २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यात १९८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ५२० विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

कोरोनामुळे मागील दोन-तीन वर्षे शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्त्वावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये चौपट वाढ करण्यात आली होती. त्यानुसार, मागील वर्षी १७३ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, एक लाख ४ हजार ५६१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्याने शाळा-महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीने घेतली जात आहे. बुधवारी बारावीचा पहिला पेपर होणार आहे. यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्याही वाढली आहे. त्यानुसार यंदा १९८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातून एक लाख ७ हजार ५२० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक पार पडली. या वेळी महाविद्यालय परिसरात सुरक्षेसह कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात राहावे, यासाठी सूचना केल्या आहेत.

विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर गर्दी

आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत असल्यामुळे मुलांसोबत पालकांचे टेन्शन देखील वाढले आहे. त्याचबरोबर आपल्या मुलाला/मुलीला परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण भासू नये, यासाठी परीक्षेच्या एक दिवस आधीच परीक्षा केंद्राचा आढावा पालक आणि विद्यार्थी घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परीक्षा केंद्रावर आपापला रोल नंबर याबाबत खात्री करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील गर्दी केली होती.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहा भरारी पथके तैनात

बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पाडाव्यात, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देण्यासाठी ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथक नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात चार अधिकारी असणार असून, यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश असणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in