वर्षभरापासून पोलीस पाटलांची ११५ पदे रिक्त; न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने ही पदे भरताना अडचण - प्रांत कार्यालय

पोलीस पाटलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने पोलीस यंत्रणेला तर ताण येतच आहे.
वर्षभरापासून पोलीस पाटलांची ११५ पदे रिक्त; न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने ही पदे भरताना अडचण - प्रांत कार्यालय

जव्हार : डोंगराळ भौगोलिक रचनेचा परीघ असलेल्या जव्हार आणि मोखाडा तालुक्यात नागरिकांचे वास्तव्य आहे, भात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने खरिपातील शेती कामे उरकल्यानंतर मिळेल ते काम करणे अथवा शहर ठिकाणी धाव घेणे अशी पिढी जात जीवनपद्धती आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने, बेमोसमी पडणारा अवकाळी पाऊस, पूर, नैसर्गिक आपत्ती वातावरणातील बदलांमुळे पिकाचे होणारे नुकसान यामुळे येथील शेतकरी अगदी बेजार झाला आहे, या सर्व परिस्थितीचा मागोवा घेण्यासाठी असलेले पोलीस पाटील या पदांची दोन्ही तालुक्यात ११५ एवढी रिक्त पदे असल्याने या भागातील नागरिकांची कामे खोळंबली आहेत.

जव्हार उपविभागात मंजूर पदे १६४ आहेत, त्यापैकी जव्हार तालुका २६, मोखाडा तालुका २३ एवढीच पदे कार्यरत आहेत, तर जव्हार जव्हार ८२ व मोखाडा ३३, अशा दोन्ही तालुक्यांतील तब्बल ११५ गावांमध्ये पोलीस पाटलांचे पद गेल्या एक वर्षापासून रिक्त आहेत. याला कारण म्हणजे हे क्षेत्र पेसा अनुसूचित येत असल्याने त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने ही पदे भरताना अडचण येत असल्याचे प्रांत कार्यालयातून सांगण्यात आले.

पोलीस पाटलांची एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने पोलीस यंत्रणेला तर ताण येतच आहे. पण महसूल विभागाचीही कामे खोळंबली आहे. त्यामुळे लवकरच पदे भरण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यामुळे रिक्त गावात सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेऊन गावातील सलोखा कायम राखण्यासाठी गावचे पुढारी पुढाकार घेत आहेत. पोलिस पाटील नसल्याने गावपातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी नागरिकांना पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे.

गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस पाटलाची भूमिका महत्त्वाची असते. त्यांना वेळेवर मानधन देणे आवश्यक असते. ग्रामस्थ व पोलीस यांच्यातील दुवा पोलीस पाटील असतो. दोघांत समन्वयाचे काम पोलीस पाटील करतो. त्याच्याच वाटेला निराशा आहे. सध्या महागाईत देणारे मानधन कमी आहे. त्यात वेळेवर मिळत नसल्याने पोलीस पाटलांची हेळसांड होत आहे. राज्यात १७ डिसेंबर १९६७ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले. त्यांचा उपयोग गावपातळीवर महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत असतो. अनेक महत्त्वाच्या कामांची जबाबदारी पोलीस पाटलांवर असताना मात्र, ११५ गावांतील पोलीस पाटलांची पदे एक वर्षापासून रिक्त आहेत.

जव्हार उपविभागातील रिक्त पोलीस पाटलांच्या जागेवर इतर गावातील पोलीस पाटील यांना पदभार दिला आहे.

- नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, जव्हार.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in