रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास मुंबईतील मीरारोडच्या नयानगर परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच, काही अघटीत घडू नये यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यात त्यांनी, या भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतल्याचे सांगत, सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच, आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.
"या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गुन्हा दाखल-
नया नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हल्लेखोरांविरुद्ध कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
शिवसेना आमदाराने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
या प्रकरणात आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी नयानगर परिसरात कोंबिग ऑपरेशन करुन, सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुणीतरी प्लॅनिंग करुन घडवून आणली आहे. त्याच्या मास्टर माईंडलाही अटक करावी, अशी मागणी सरनाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.
नाहीतर मीरा-भाईंदर बंदची हाक-
मीरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणीतरी प्रयत्न करत असून, यात 200 हून अधिक आरोपी आहे. नया नगरमध्ये कोंबिंग ऑपरेशन करुन 48 तासात सर्वांना अटक करण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. असे न झाल्यास 25 जानेवारीला मीरा भाईंदर बंदची हाक सरनाईक यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी रात्री मीरा रोडच्या नयानगर परिसरात तीन कार आणि अनेक दुचाकींवरुन रॅली काढली होती. यावेळी या लोकांकडून प्रभू श्रीरामांबद्दल घोषणाबाजी केली जात होती. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घोषणा देणाऱ्या काही लोकांनी कथितपणे फटाके फोडले. यानंतर काही स्थानिक लोक लाठ्या-काठ्या घेऊन बाहेर आले. यानंतर दोन्ही गटात बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी रॅलीतल्या लोकांच्या वाहनांची तोडफोड करत त्यांना मारहाणदेखील केली. यावेळी पोलिसांनी वेळेत मध्यस्थी करत हा वाद मिटवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. या व्यतिरिक्त दंगल नियंत्रण पथकाची तुकडीही तैनात करण्यात आली आहे.